
एकादशीच्या स्नानासाठी गेलेल्या सासूबाईंचं शव नदीपात्रात सापडल्याने कुटुंबात शोककळा !
MH 28 News Live / जळगाव जामोद : धार्मिक श्रद्धेने एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानासाठी घराबाहेर पडलेल्या ८० वर्षांच्या गुंफाबाई श्रीराम खेडकर या वृद्ध भाविक महिलेचा मृतदेह येरडी पूर्णा नदीपात्रात आढळून आल्याने संग्रामपूर गावावर शोककळा पसरली आहे. ही हृदयद्रावक घटना २३ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.

गुंफाबाई या नेहमीप्रमाणे एकादशीच्या स्नानासाठी निघाल्या होत्या, मात्र बराच वेळ उलटून गेला तरी त्या परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या जावयाने – उमेश भिकाजी टाकळकर (रा. खापरखेड, ता. तेल्हारा) यांनी तामगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता, जळगाव जामोद तालुक्यातील येरडी गावाजवळील पूर्णा नदीच्या पुलाखाली गुंफाबाई यांचा मृतदेह आढळून आला. ही बातमी कळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वृद्ध आईचा मृत्यू अशा दुर्दैवी परिस्थितीत झाला, यावर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी कठीण जात आहे.

दरम्यान, जळगाव जामोद पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, पोलीस हवालदार अतुल मोहाळे हे तपासाचे नेतृत्व करत आहेत. गुंफाबाई यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला – अपघात, निसर्गिक मृत्यू की इतर काही कारण – याचा उलगडा होणे आवश्यक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रद्धेने गेलेल्या वृद्ध भक्तेचा असा अंत होणे ही निःसंशय दु:खद बाब आहे.



