
स्वयंपाक का केला नाही ? पत्नीवर पेट्रोल फेकून मारहाण… देऊळगाव राजा तालुक्यात पतीच्या विकृत संतापाची हद्द
MH 28 News Live / देऊळगाव राजा : “स्वयंपाक का केला नाही ?” या कारणावरून संतप्त पतीने पत्नीवर पेट्रोल फेकून शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गारखेड येथे उघडकीस आली आहे. संतोष भास्कर मस्के (रा. गारखेड) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
ही संतापजनक घटना २९ जुलै रोजी दुपारी घडली. वारंवार दारूच्या नशेत पत्नीवर अत्याचार करणाऱ्या संतोषने त्या दिवशी केवळ स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाच्या भरात त्याने तिच्यावर पेट्रोल फेकून शिवीगाळ व मारहाण केली, अशी माहिती पीडितेने तक्रारीत दिली आहे. त्यानंतर काही दिवसांनी, ३१ जुलै रोजी पीडित पत्नीने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात हकीकत नोंदवत पतीविरोधात गुन्हा दाखल केला. तिच्या तक्रारीनुसार, आरोपी पती सतत मद्यपान करून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करत होता.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. महिलांवरील अशा अत्याचाराच्या घटनांनी समाजमन पुन्हा एकदा हादरले असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.