
धोकादायक वीज खांबाने घेतला शेतकऱ्याचा बळी; वीज कंपनीच्या हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
MH 28 News Live / खामगाव : वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना सोनाळा वानखेडे (ता. संग्रामपूर) येथे घडली. घरासमोर अवघ्या एक फूट अंतरावर असलेल्या धोकादायक वीज खांबामुळे राजेंद्र नरसिंगराव देशमुख (वय ६०) या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतक राजेंद्र देशमुख यांच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. अपघातानंतर शोकाकुल झालेल्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्या भावाने विनोद देशमुख यांनी संग्रामपूर पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीतील संबंधित अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. यात खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता, संग्रामपूरचे उपकार्यकारी अभियंता, वरवट बकाल येथील सहाय्यक अभियंता आणि वानखेडे गावचा लाईनमन यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वीज खांब तळाला पूर्णतः गंजलेला असून तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत होता. यावर अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. खांब स्थलांतरित करणे आणि वायरिंगची दुरुस्ती करणे यासाठीही विनंती करण्यात आली होती. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप आहे.
रस्त्यालगत असलेल्या या खांबावर असुरक्षितपणे अनेक वीज जोडण्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी जीवितहानी होण्याचा धोका वारंवार अधोरेखित केला जात होता. तरीदेखील वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एक निरपराध शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या प्रकरणी तातडीने दोषींवर कारवाई करून मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली आहे.



