♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंकज देशमुख संशयास्पद मृत्यू प्रकरणी पत्नीचं उपोषण; सीआयडी चौकशीची मागणी

MH 28 News Live / जळगाव जामोद : भाजपाचे स्थानिक आमदार संजय कुटे यांचे कारचालक व पक्षाचे पदाधिकारी पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूला शंभर दिवस उलटूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी आपल्या दोन लहान मुलांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे.

 

सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस दलावर गंभीर आरोप करत, पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा संशय असलेल्या तीन भाजपा कार्यकर्त्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये आमदार संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. “न्याय मिळेपर्यंत आणि सत्य बाहेर येईपर्यंत मी लढा सुरूच ठेवणार,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

पोलीस निष्कर्षावर असमाधान

गेल्या आठवड्यात पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन पंकज देशमुख यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे घोषित केले. मात्र, मृतदेहावरील जखमा व इतर परिस्थितीजन्य पुराव्यांवरून हा घातपात असल्याचा संशय कुटुंबीय व्यक्त करत आहेत. पोलिसांनी सुनीता देशमुख यांनी दिलेल्या संशयितांची चौकशी अद्याप न केल्यामुळे त्यांचा संशय अधिकच बळावला आहे. मागील तीन महिन्यांपासून सीआयडी चौकशीची मागणी सातत्याने केली जात असूनही प्रशासनाने अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान वाद

सुनीता देशमुख यांनी आरोप केला की, चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संजय कुटे यांच्या घरी सांत्वन भेटीस आले असताना, बुलढाणा पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवून नंतर पोलीस ठाण्यात नेले आणि दोन तास बसवून ठेवले.

घटनेचा मागोवा

३ मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. हात, पाय आणि मानेवर अनेक जखमा असल्याने मृत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. प्रकरणात आत्महत्येऐवजी घातपाताचा संशय असल्याची तक्रार सुनीता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती व बुलढाणा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129