
मेहकर फाटा अपघात : एसटी बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
MH 28 News Live / चिखली : जवळील मेहकर फाटा येथे शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला.

सायळा (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) येथील गणेश दत्तुगीर गिरी (वय ६०) हे आपल्या बजाज सीटी हंड्रेड (क्र. एमएच २८ बीयू ०५९३) मोटारसायकलवरून चिखलीकडे येत होते. दरम्यान, एस.टी. बस (क्र. एमएच ४० एन ९१३३) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गणेश गिरी यांचा जागीच मृत्यू झाला.
गणेश गिरी हे चिखली येथील तलाठी विनोद गिरी यांचे वडील असल्याने प्रशासकीय वर्तुळासह स्थानिकांमध्ये या अपघातामुळे खळबळ उडाली. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर पोलिसांनी ती सुरळीत केली. पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मेहकर फाटा परिसरात सतत घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाढती वाहतूक कोंडी, निष्काळजी वाहनचालक आणि वेगमर्यादेचा भंग हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, प्रवासी व वाहनधारकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वेगमर्यादा लागू करणे, वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती ठेवणे आणि निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे, ही काळाची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.



