
जुळ्या बहिणींच्या मेंदूत एकसारख्या गाठी; साई संस्थानात दुर्मीळ शस्त्रक्रियेची यशोगाथा
MH 28 News Live / शेगाव : तालुक्यातील नागझरी येथील जुळ्या बहिणींच्या आयुष्यात वैद्यकीय विश्वाला थक्क करणारा दुर्मीळ योगायोग घडला आहे. ४२ वर्षीय सुनीता साबे आणि दुर्गा उगले या दोन्ही बहिणींच्या मेंदूमध्ये एकाच ठिकाणी, एकाच आकाराच्या व अगदी एकसारख्या स्वरूपाच्या गाठी आढळल्या. आश्चर्याची बाब म्हणजे, या गाठींच्या शस्त्रक्रियाही एकाच न्यूरोसर्जनने यशस्वीरीत्या पार पाडल्या.
साई संस्थान रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांनी काही दिवसांच्या अंतराने या दोन्ही बहिणींवर ऑपरेशन करून गाठी काढल्या. या दुर्मीळ शस्त्रक्रियांनी वैद्यकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवली आहे.

दुर्गा उगले यांना दीर्घकाळ डोकेदुखीचा त्रास असल्याने आठ महिन्यांपूर्वी तपासणी करण्यात आली. एमआयआरमध्ये त्यांच्या मेंदूमध्ये डाव्या बाजूस साधारण पाच बाय पाच से.मी.ची गाठ आढळली आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जुळ्या बहिणी सुनीता साबे यांनीही डोकेदुखीची तक्रार केली. तपासणीत त्यांच्या मेंदूतही अगदी तशीच गाठ असल्याचे स्पष्ट झाले. हा दुर्मिळ योगायोग पाहून संपूर्ण वैद्यकीय पथक अचंबित झाले.
दोन्ही बहिणींच्या शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या. भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे, डॉ. निहार जोशी यांच्यासह न्यूरो ओटी टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक आणि उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी या यशाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

शस्त्रक्रियेनंतर गाठींचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्यात आले असता त्या पूर्णपणे समान स्वरूपाच्या असल्याचे आढळले. जुळ्या बहिणींमध्ये एकसारखा आजार आढळणे सामान्य असले, तरी एकाच ठिकाणी, एकाच बाजूस, एकसारख्या आकाराची गाठ आणि त्यावर एकाच न्यूरोसर्जनने यशस्वी शस्त्रक्रिया करणे हा अत्यंत दुर्मीळ प्रकार असल्याचे डॉ. मुकुंद चौधरी यांनी स्पष्ट केले.



