
गुंगीचे औषध देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार; तरुण आणि त्याच्या बहिणीवर शेगावात गुन्हा दाखल
MH 28 News Live / शेगाव : जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या काळ्या मालिकेत आणखी एका रक्त गोठवणाऱ्या घटनेने समाजाला हादरून सोडले आहे. शेगाव शहरात एका विवाहित महिलेला अमानुषपणे गुंगीचे औषध पाजून वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या क्रूर कृत्यामागे असलेला आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे आणि त्याला साथ देणारी त्याची बहीण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी सचिनने तिला फसवून घरी बोलावले आणि चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले. यानंतर तिच्या असहाय अवस्थेचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यापुरते न थांबता, त्याने पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना व्हायरल करण्याची धमकी देत दीर्घकाळ तिच्यावर अत्याचार सुरू ठेवले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असूनही आरोपीच्या बहिणीने त्याला साथ देत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.

या खळबळजनक प्रकरणात शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 523/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 64(2)(m), 351(2), 3(5) अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
जिल्ह्यात अलीकडेच एका मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांचा निर्घृण खून आणि प्रेमी युगलाच्या दुहेरी हत्याकांडाने जनमानसात भीती निर्माण केली होती. आता या लैंगिक अत्याचाराच्या भयंकर घटनेने पुन्हा एकदा “महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे?” याची जाणीव करून दिली आहे. या प्रकरणाने शेगाव शहरात प्रचंड संताप आणि अस्वस्थता पसरली असून, समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.



