
चिखलीकरांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलात अत्याधुनिक वाहन दाखल ; आ. श्वेताताई महाले यांनी केले लोकार्पण
MH 28 News Live / चिखली : नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज नवे वाहन दाखल झाले असून, त्याचे लोकार्पण आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते नगर परिषद प्रांगणात करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार महाले म्हणाल्या, “अग्निशमन दल हे केवळ आगीवर नियंत्रण ठेवणारे पथक नसून प्रत्येक प्रकारच्या आपत्तीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रथम धाव घेणारे सैनिक आहेत. रस्ते अपघात, पूरस्थिती, आगीच्या घटना अथवा कोणतीही आपत्कालीन वेळ असो, अग्निशमन दलाचे जवान अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्या या अथक सेवेला योग्य साधने आणि सुविधा मिळणे हीच खरी कृतज्ञता आहे. या नव्या वाहनामुळे चिखली तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेची ताकद अधिक बळकट झाली आहे.”

कार्यक्रमाला मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, ठाणेदार संग्राम पाटील, ज्येष्ठ नेते सुरेशअप्पा खबूतरे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष विमलताई देव्हडे, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



