
रेखाताईं खेडेकरांचा अचानक रा. कॉ. शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष राजीनामा; पवार गटात खळबळ ! पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार ?
MH 28 News Live / चिखली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी अचानक पदाचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राद्वारे सादर करत, “वैयक्तिक कारणांमुळे” हा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून पक्षातील गोटात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, आज सायंकाळी चिखली येथे पोहोचल्यावर आपल्या निर्णयाबाबत रेखाताई सविस्तर खुलासा करणार असल्याची माहिती आहे.

पवार गटात वाढली चिंता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुलढाणा, हिंगोली आणि अहिल्यानगर याजि तीन ल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याने पवार गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेखाताई खेडेकर यांनी मागील तीन वर्षांपासून बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, त्या चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षात राहून आमदार व जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्या अजित पवार गटात जाणार काय, या चर्चेला आता उधाण आले असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.



