
युती असो वा नसो… चिखली पालिकेसाठी राष्ट्रवादी सज्ज ! शंतनू बोंद्रे यांचा ‘ अल्टिमेटम ‘
MH 28 News Live / चिखली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपल्या निवडणूक रणतयारीचा बिगुल वाजवला. चिखली तालुक्यातील बाजार समितीच्या सभागृहात १८ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे यांनी ठाम शब्दांत घोषणा केली की, “युती होवो की नको, पक्ष स्वतःच्या बळावर लढण्यास सज्ज आहे.”

या बैठकीने तालुक्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढवले. शंतनू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. “गावोगावी जा, जनतेशी संवाद साधा, त्यांच्या समस्यांचे निराकरण करा; कारण जनतेचा विश्वास जिंकणाऱ्यालाच नेतृत्वाचा सन्मान मिळतो,” असे आवाहन बोंद्रे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त सत्तेसाठी नव्हे तर सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. “युतीचा निर्णय काहीही असो, आम्ही तयार आहोत,” असे ठामपणे सांगत त्यांनी पक्षाची भूमिका अधिक ठोस केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या बैठकीस तालुका व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष संतोष परिहार व शहराध्यक्ष तुषार बोंद्रे यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या या बैठकीला मनोज दांडगे, विजय अंभोरे, वसीम खान, रुपेश गवई, उमेश राठोड, डॉ. नितीन पाटील, सुनील सुरडकर, नजीर खान, विलास वसु, योगेश गवते, विशाल थुट्टे, रामेश्वर इंगळे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

बैठकीत निवडणुकीसाठीच्या रणनितीवर सविस्तर चर्चा झाली. गावोगावी जनसंपर्क मोहिमा, मतदार संपर्क, स्थानिक प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद अशा कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठरवले की, पुढील काही दिवसांत “जनतेकडे चला” ही मोहिम राबवण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रणतयारीनंतर चिखली तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने आखली जाण्याची चिन्हे आहेत. युतीचा निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी राष्ट्रवादीने केलेली तयारी आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता, आगामी निवडणुका अधिक रंगतदार व स्पर्धात्मक ठरणार, हे निश्चित झाले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, बुलढाण्यातील ही बैठक ही केवळ तयारी नाही, तर विरोधकांसाठी दिलेला ‘राजकीय संदेश’ आहे — की राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही ताकदीने मैदानात आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका हा तिच्या संघटनशक्तीचा मोठा कस लागणारा टप्पा ठरणार आहे.



