♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीकर निवडणार सुशिक्षित – अभ्यासू नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या उमेदवारीवर जनतेचा विश्वास दृढ

MH 28 News Live / चिखली : नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस–शिवसेना युतीने नगराध्यक्षपदासाठी दिलेला अत्यंत सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश नारायणराव गावंडे जाहीर होताच शहरात उत्साहाची लाट उसळली आहे. शिक्षण, समाजकार्य आणि प्रशासन या तिन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी असलेल्या डॉ. गावंडे यांच्या उमेदवारीला युवक, नोकरदार वर्ग, व्यापारी, महिला आणि विविध सामाजिक स्तरातून मोठा पाठिंबा व्यक्त होत असून प्राचार्य गावंडे यांच्या रूपाने सुशिक्षित व अभ्यासू नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले असून त्यांच्यामुळे चिखलीच्या भविष्याला नवी दिशा लाभणार असल्याचा नागरिकांचा विश्वास व्यक्त होत आहे.

डॉ. निलेश गावंडे हे M.Lib.I.Sc., SET, Ph.D. अशा उच्चशैक्षणिक पात्रतेसह साखरखेर्डा येथील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सिनेट सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, अभ्यास मंडळ अध्यक्ष, शुल्क समिती सदस्य अशा महत्त्वाच्या धोरणात्मक भूमिकांमधून त्यांनी शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगदान दिले आहे.

शिक्षणासोबत राजकारणातही निर्णायक वाटचाल

चिखली नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकारी सदस्य अशा राजकीय भूमिकांमधून त्यांनी स्थानिक प्रश्न समजून घेऊन विकासात्मक उपाय सुचवले आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यासोबतच्या महत्त्वपूर्ण विद्यापीठ कायदा चर्चेत अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी शहराच्या आवाजाला सक्षम व्यासपीठ मिळवून दिले.

विद्यार्थी संशोधनासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व

ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयातील मान्यताप्राप्त आचार्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी ८ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी मिळवून दिली असून १४ विद्यार्थ्यांना शोधप्रबंधासाठी दिशा दिली आहे. नागपूर व नांदेड विद्यापीठात परीक्षक म्हणूनही त्यांनी ज्ञानक्षेत्रात लौकिक कमावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक प्रगतीची नवी दारे खुली झाली आहेत.

चिखलीच्या जनतेला विकासाची खात्री

सुसंस्कृत स्वभाव, पारदर्शी कार्यशैली आणि शिक्षणातून आलेली विचारशील दृष्टी यामुळे प्राचार्य डॉ. गावंडे यांच्या उमेदवारीकडे शहराकडून प्रचंड अपेक्षेने पाहिले जात आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था, युवकांना रोजगार दिशा, महिलांसाठी सुरक्षित आणि सक्षम वातावरण, तर व्यापाऱ्यांसाठी स्थिर व्यावसायिक धोरण या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली आहे.

शहरविकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सुशिक्षित, अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असून त्या जागी प्राचार्य डॉ. निलेश गावंडे हे सर्वार्थाने योग्य उमेदवार असल्याचा विश्वास शहरात दृढ होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129