
शेतवाटेवरील प्रवास ठरला अखेरचा; सुट्टीवर आलेल्या जवानाच्या पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू
MH 28 News Live / सिंदखेड राजा : तालुक्यात शेतालगतच्या रस्त्यावर घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान प्रमोद सुरेश गवई हे सुट्टीवर घरी आल्यानंतर आपल्या पत्नी कोमल गवई आणि लहान मुलासह दुचाकीवरून सासरवाडी लोणारकडे निघाले होते. शेतशिवारातून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास सुरू असतानाच हा आनंदाचा क्षण काळजाला चिरणाऱ्या शोकांतिकेत बदलला.

सिंदखेड राजा रस्त्यालगत असलेल्या शेताजवळ अचानक एका अज्ञात बैलगाडीचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागला. शेतकामासाठी वापरल्या जाणाऱ्या या रस्त्यावर दुचाकीचा तोल गेला आणि मागे बसलेल्या कोमल गवई या थेट रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी समोरून जालन्याकडे जाणारा भरधाव ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने अवघ्या २५ वर्षांच्या कोमल गवई यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. प्रमोद गवई (वय ३२) हे बुलाढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुक येथील रहिवासी असून ते भारतीय सैन्यात जवान आहेत. सुट्टीत कुटुंबासोबत शेतशिवारातून प्रवास करताना पत्नीला कायमचे गमवावे लागल्याने त्यांच्या आयुष्यातील ही भेट अखेरची ठरली. अपघातात प्रमोद गवई आणि त्यांचा चिमुकला मुलगा हे दोघेही सुदैवाने बचावले असले, तरी गवई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेतरस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेड राजा येथील रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. शेतालगतच्या अरुंद रस्त्यांवर बैलगाड्या, दुचाकी आणि अवजड वाहनांची एकाच वेळी होणारी वर्दळ जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, सुट्टीवर आलेल्या जवानाच्या पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण शेतकरी व ग्रामीण भागात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.



