♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हत्ती गेला अन् शेपूट राहिले… चिखली शहरातील मुख्य रस्त्याचे भिजत पडले घोंगडे… काम पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराचे घूमजाव, दोन कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

MH 28 News Live, चिखली : शहरातील सर्वात प्रमुख हमरस्ता असलेल्या अंतर्गत रस्त्याचे भिजत घोंगडे पडलेले आहे. खामगाव चौफुली – बस स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सिध्द सायंस मंदिरापर्यंतच्या या रस्त्याचे काम मूदत पूर्ण झाल्यानंतरही अपूर्ण असून हे काम पूर्ण करण्यास संबंधित ठेकेदार आता नकार देत असल्याने या रस्त्यासाठी आलेल्या निधीपैकी दोन कोटी रुपये परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी चिखली शहरासाठी भरघोस विकास निधी मंजूर केला. या अंतर्गत खामगाव चौफुली – बस स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सिद्ध सायंस मंदिरापर्यंतच्या अंतर्गत हमरस्त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यापूर्वीची कामे निकृष्ट दर्जाची केल्याने सदर काम नगर पालिकेच्या अधिकारात न ठेवता राज्य शासनाने स्वतः करून घ्यावे अशी मागणी तेव्हा काही जागरूक नागरिकांनी केली होती. परंतु, त्या मागणीची पूर्तता होऊ शकली नाही.

सदर काम नगरपालिकेच्या माध्यमातूनच पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर या कामाचा ठेका बुलडाणा येथील एबीसी स्ट्रक्चरल कंपनीला देण्यात आला. खामगाव चौफुली पासून बसस्थानकासमोरील व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असतानाच अनेक नागरिकांनी या कामाच्या दर्जाबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या. तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांनी सदर कामास भेट देऊन कामाची पाहणी देखील केलीहोती. अनेक वेळेला हे काम सुरू असताना वादाचे प्रसंग उद्भवलेला व त्यामुळे काम थांबवावे लागले होते. विशेष म्हणजे या कामाबाबत भारतीय जनता पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी सुद्धा जाहीरपणे नाराजी व्यक्त करून कामाच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले होते.

दरम्यान नगरपालिकेचा कालावधी पूर्ण होऊन तत्कालीन नगरसेवक व नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आता अधिकारपदावरून खाली उतरले असून पालिकेमध्ये मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. परंतु, या बहुचर्चित रस्त्याचे मात्र अद्यापही भिजत घोंगडे पडलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सिद्ध सायंस मंदिरापर्यंतच्या भागात तयार झालेल्या या रस्त्याच्या दुतर्फा कुठेही नाल्यांचे बांधकाम व पेवर ब्लॉक बसवण्यात न आल्यामुळे सदर बांधकाम अपूर्णावस्थेत आहे. या रस्त्याच्या इस्टिमेट मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्यांचे बांधकाम व पदपथ म्हणून दोन्ही बाजूंनी पेवर ब्लॉक बसवण्याचे निर्देशित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कामाची विहित मुदत पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याच्या दुतर्फा नाल्या व पेवर पेवर ब्लॉक अद्यापही बसवल्या गेले नाहीत. या संदर्भात चिखली नगरपालिकेने संबंधित ठेकेदारास पत्रव्यवहार केला. मात्र त्याने हे काम करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. सध्या वाढलेल्या बांधकाम साहित्याच्या दरामुळे आपल्याला हे काम करणे परवडत नसल्याचे कारण सांगून संबंधित ठेकेदाराने अपूर्ण असलेल्या नाल्यांचे व पेव्हर ब्लॉकचे काम करण्यास नकार कळविला याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या मुजोर ठेकेदारापुढे नगरपालिका प्रशासनाने देखील हा टाकल्याचे खेदाने म्हणावेसे वाटते. या प्रकारामुळे चिखली नगरपालिकेला या रस्त्याच्या कामासाठी आलेल्या १६ कोटी रुपयांच्या निधीपैकी दोन कोटी रुपये शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली असून तसे झाल्यास निधी परत जाईल आणि काम देखील अपूर्ण राहील. त्यामुळे हत्ती गेला आणि शेपूट राहिले अशा अवस्थेमध्ये या रस्त्याचे काम येऊन पोचले आहे.

आता न. प. प्रशासन काय करणार ?

वास्तविक सदर रस्त्याच्या कामाची वर्क आँर्डर निघताना ठराविक मुदतीत हे काम पूर्ण करणे बंधनकारक होते. त्यामुळे इस्टिमेटमध्ये उल्लेख केलेल्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करणे ही त्याची कायदेशीर जबाबदारी ठरते. तसे न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई आकारण्याचा अधिकार नगर पालिकेस आहे. परंतु संबंधित ठेकेदार आता नगर पालिकेस जुमानायला तयार नाही हे स्पष्ट दिसते. या प्रकाराबाबत नगरपालिका प्रशासनाने थेट राज्य शासनाकडे सदर ठेकेदाराची तक्रार करून त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा चिखलीकर नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांची ही अपेक्षा नगरपालिका प्रशासन पूर्ण करेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129