
साहिल आणि ऋतुजा यांच्या प्रेमकथेचा शोकांत शेवट; गावभर हळहळ, डोळ्यांत अश्रू, पोलीस बंदोबस्तात झाले अंत्यसंस्कार
MH 28 News Live / साखरखेर्डा : येथील सोनू उर्फ साहील राजपूत या तरुणाने जवळच्याच शिंदी गावातील ऋतुजा खरात या युवतीचा प्रेमसंबंध व अंतर्गत वादाच्या कारणावरून जुगनू हॉटेलमध्ये चाकूने भोसकून खून केला होता. या घटनेनंतर अपराधगंडाने ग्रासलेल्या साहीलनेही स्वतःच्या अंगावरच वार करून आपले जीवन संपवले. दोन तरुणांचे उमलते आयुष्य अशा दुर्दैवी पद्धतीने संपल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

काल २४ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता साखरखेर्डा येथे साहीलच्या पार्थिवावर, तर संध्याकाळी सहा वाजता शिंदी गावात ऋतुजाच्या पार्थिवावर अश्रुपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. या अंत्ययात्रांना मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा दाटून आली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेने गावकऱ्यांचे मन सुन्न झाले असून, एका प्रेमकहाणीचा इतका शोकांत शेवट पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी तर ओठांवर हळहळ व्यक्त होताना दिसली.



