
आशासेविका घेऊन निघालेल्या ॲपेला लक्झरी बस घासली; ८ जण गंभीर जखमी, जळगाव जामोद तालुक्यात आसलगाव जवळ अपघात
MH 28 News Live, जळगाव जामोद : लक्झरी बस ओव्हरेटक करताना ॲपेला घासली. त्यामुळे ॲपे आसलगाव नदीच्या पुलावरील कठड्याच्या पाइपांना धडकून फसली. यात ॲपेमधील ८ प्रवासी जखमी झाले. ही घटना २२ मार्चला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जळगाव जामोद ते आसलगाव रोडवर घडली.
ॲपेमालक ज्ञानेश्वर गजानन भोपळे (२३, रा. सावरगाव ता. जळगाव जामोद) याच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी श्री साईराम लक्झरी बस (MH19Y6030) चा चालक रमेश पंढरीनाथ पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर आणि त्याचा आत्येभाऊ मंगेश किसन सातव (रा. वडनेर भोलजी, ह. मु. सावरगाव) असे दोघे मिळून ॲपे (MH 28 T 1298) चालवतात. अपघात झाला तेव्हा मंगेश ॲपे चालवत होता. जळगाव जामोद येथून पंचायत समितीच्या आशा वर्कर महिला घेऊन तो आसलगावला येत होता.
आसलगाव नदीच्या पुलाजवळ श्री साईराम लक्झरी बसने ॲपेला ओव्हरटेक करताना घसाटा मारला. त्यामुळे ॲपे आसलगाव नदीच्या पुलावरील कठड्यातील पाइपांत फसली. यात दादाराव गवई, शीलाबाई वानखडे, सुजाता वाकोडे, ॲपेचालक मंगेश, उषाबाई सरोदे, वर्षाबाई लहासे, सरीताबाई वासनकार, अंकुश खोकरे हे जखमी झाले. ॲपेचेही २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
जखमींना आसलगाव येथील उल्हास माहोदे यांच्या रुग्णवाहिकेने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यासाठी ओम ठाकूर, सरपंच श्री. डिवरे, किरण येणकर (सर्व रा. आसलगाव) यांनी मदतकार्य केले. गंभीर जखमींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सरीताबाई वासनकार यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांना खामगावच्या डॉ. चांदे हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. शीलाबाई वानखडे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खामगावच्या सिल्वरसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.