
नागरिकांच्या सुविधेसाठी मोदी सरकार सुरू करणार नवीन पोर्टल. वेगवेगळ्या १५ योजनांसाठी ठरणार उपयुक्त
MH 28 News Live : सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या उद्देशाने विविध मंत्रालये आणि विभागांमार्फत चालवल्या जाणार्या विविध योजनांसाठी केंद्रातील मोदी सरकार लवकरच एक ‘कॉमन पोर्टल’ घेऊन येत आहे.
असे पोर्टल सुरू करण्याच्या प्रस्तावावर सरकार काम करत आहे. सूत्रांनी सांगितले की, मोदी सरकारच्या मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनाअंतर्गत विविध योजनांसाठी नवीन पोर्टलमध्ये कर्ज – आधारित १५ सरकारी योजनांचा समावेश करण्यात येणार आहे.
योजनांचा होणार हळूहळू विस्तार
कॉमन पोर्टलवरील योजनांचा हळूहळू सुसंगत विस्तार केला जाईल, कारण काही केंद्र प्रायोजित योजनांमध्ये अनेक एजन्सींचा सहभाग आहे. उदाहरणार्थ, प्रधान मंत्री आवास योजना आणि क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम सारख्या योजना विविध मंत्रालयांद्वारे संचालित केल्या जात आहेत. हे लक्षात घेऊन, या योजना प्रस्तावित पोर्टलमध्ये एकाच व्यासपीठावर आणल्या जातील, जेणेकरून लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल.
पोर्टलची चाचणी सुरू
सूत्रांनी सांगितले की, याची प्रायोगिक चाचणी केली जात असून हे पोर्टल सुरू करण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार केला जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर बँका ही चाचणी घेत आहेत. सूत्रांनी सांगितले की, राज्य सरकारे आणि इतर संस्था देखील या व्यासपीठावर त्यांच्या योजनांचा समावेश करण्याची शक्यता आहे.



