
एच.आय.व्ही संसर्गित व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी – अप्पर जिल्हाधिकारी
MH 28 News Live, बुलडाणा : एच.आय.व्ही संसर्गित व्यक्ती व अतिजोखमीच्या व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. यामध्ये अशासकीय संस्थांनी आपले काम वाढवावे. रक्त संकलन शिबीरांमध्ये विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन रक्तदान करावे जेणेकरुन जिल्हयामध्ये रुग्णांकरीता रक्तसाठा उपलब्ध राहील, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, एचआयव्ही टि. बी समन्वय समितीची सभेचे आयोजन ३० मार्च रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या सभेला अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिनाक्षी बनसोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ए.व्हि. खिरोडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यस्मीन चौधरी, वैद्यकीय अधिकारी (टिबीएस) डॉ.आनंद कोठारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, वैद्यकीय अधिकारी ( एआरटी), डॉ.सुनिल राजपुत, अशासकिय संस्थेचे कर्मचारी, डापकु व एआरटी कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी माहे जानेवारी ते मार्च च्या एच.आय.व्ही तपासणीचा व उपचाराचा आढावा दिला. सभेमध्ये रक्तपेढी, गुप्त आजार तपासणी केंद्र, टिबी, अशासकीय संस्था यांच्या कामाचा आढावा घेतला. सभेला संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.