
रक्त गोठवणारा थरार ! भररस्त्यात उच्चशिक्षित डॉक्टरने स्वतःला पेटवले; नांदुरा हादरले
MH 28 News Live / नांदुरा : जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अंगावर शहारे आणणारी घटना आज नांदुरा तालुक्यात घडली. आलमपूर फाट्यावर प्रवाशांनी, दुकानांनी व वाहतुकीने गजबजलेल्या रस्त्यावर अचानक एक उच्चशिक्षित व्यक्ती पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवताच क्षणभर सर्वत्र गोंधळ उडाला. पेटलेल्या आगीच्या ज्वाळांनी आसमंत लालभडक झाला, किंचाळ्या, धावपळ आणि भयभीत नजरा या दुर्दैवी थराराला साक्ष होत होत्या.

डॉ. चंदू पाटील (रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद), हे पशुवैद्यकीय कर्मचारी, कौटुंबिक कलहाने त्रस्त झाले होते. त्यांनी अचानक भर रस्त्यात हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रोजच्याप्रमाणे प्रवासी, कामगार, विद्यार्थी गर्दीत गुंतलेले असताना पेट्रोल अंगावर ओतताच डॉ. पाटील उभेच पेटले. काही क्षणांसाठी लोकांचा श्वासच रोखला गेला.
परंतु, धाडसी नागरिकांनी प्रसंगावधान राखत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तरी तोपर्यंत डॉक्टर गंभीर भाजले गेले होते. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी डॉक्टरांना तातडीने खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे.

नांदुरा-जळगाव जामोद मार्गावरील आलमपूर फाट्यावर घडलेली ही घटना अजूनही अनेकांच्या नजरेसमोरून हटत नाही. जिवंत व्यक्तीला पेटलेले पाहण्याचा अंगावर काटा आणणारा अनुभव आज अनेकांनी घेतला. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, डॉ. पाटील मृत्यूशी झुंज देत असून, त्यांच्या प्रकृतीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. या थरारक घटनेने नांदुरा तालुका आणि संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.



