
न्याय मिळेपर्यंत हटणार नाही’;… आदिवासींचा डोणगाव ठाण्यात ठिय्या ! आदिवासी युवकाला मारहाण प्रकरणी पोलिसांवर आरोप
MH 28 News Live / डोणगाव : नागेशवाडी येथील आदिवासी युवकाला मारहाण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली नसल्याचा आरोप करत विविध आदिवासी संघटनांसह समाजबांधवांनी २६ सप्टेंबर रोजी डोणगाव पोलीस ठाण्याला घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत संबंधित आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासीबहुल नागेशवाडी येथे २१ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अर्जुन कृष्णा डाखोरे (वय २५) या युवकाला घाटबोरी येथील काही युवकांनी गावात येऊन मारहाण केल्याचे सांगण्यात आले. या घटनेत जखमी झालेल्या अर्जुन डाखोरे याला त्याच्या नातेवाइकांनी फिर्याद देण्यासाठी डोणगाव पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलिसांनी त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे रेफर करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी जखमी युवक व त्याचे नातेवाईक फिर्याद नोंदविण्यासाठी डोणगाव पोलीस ठाण्यात गेले. मात्र, त्यावेळीही फिर्याद नोंदवून घेण्यात आली नसल्याचा आरोप आदिवासी समाजबांधवांनी केला. त्यानंतर पुन्हा फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विविध आदिवासी संघटना व समाजबांधवांनी २६ सप्टेंबर रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात धडक देत घेराव घातला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी ठिय्या मांडत संबंधित आरोपींवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.
दरम्यान, मागील दोन वेळा फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असताना तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, तसेच त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या आणि फिर्याद नोंदवून न घेतल्याचा आरोप असलेल्या पोलीस अंमलदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.
आदिवासी समाजबांधवांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, आपल्या हक्कांसाठी हा लढा असून अन्याय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. आरोपींवर कायदेशीर कारवाई होऊन अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



