♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महा लॅबच्या सेवा ठप्प; गरीब रुग्णांची गैरसोय ! दोन वर्षांची शासकीय देयके थकल्याने रक्तनमुना संकलन व प्रयोगशाळा तपासण्या बंद; खासगी लॅबचा खर्च परवडेना

MH 28 News Live / डोणगाव : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ‘आपला दवाखाना‘ येथे महा लॅबच्या माध्यमातून सुरू असलेल्या रक्तनमुना संकलन व प्रयोगशाळा तपासणी सेवा अचानक बंद झाल्याने गरीब आणि गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे HLL कंपनीची शासनाकडील मागील दोन वर्षांपासूनची देयके प्रलंबित असल्याने या सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत किंवा अल्प दरात उपलब्ध होणाऱ्या तपासण्यांचा आधार हिरावल्याने सर्वसामान्य रुग्णांना खासगी प्रयोगशाळांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

खासगी तपासण्यांचा आर्थिक भार

आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांना खासगी प्रयोगशाळांमधील महागड्या तपासण्या परवडणाऱ्या नाहीत. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी महा लॅबच्या सेवा मोठा आधार होत्या. मात्र, या सेवा बंद पडल्याने रुग्णांना तपासण्यांसाठी खासगी लॅबचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. आरोग्य सेवा खंडित झाल्याने त्रस्त नागरिकांकडून आमदार कार्यालयाशी संपर्क साधून तक्रारी केल्या जात असून, तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रलंबित देयके तातडीने द्या !

सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी राज्य शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. HLL कंपनीची प्रलंबित देयके अदा करून राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ‘आपला दवाखाना’ येथील महा लॅबच्या रक्तनमुना संकलन व प्रयोगशाळा तपासणी सेवा त्वरित पूर्ववत कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. शासनाच्या आर्थिक दिरंगाईचा फटका रुग्णांना बसू नये, यासाठी आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129