♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हिंदू समाज संघटित राहिल्यास देश अधिक मजबूत होईल – दुर्गादास व्यास चिखलीत रा. स्व. संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात संपन्न

MH 28 News Live / चिखली: हिंदू समाज दोषमुक्त, ताकदवान आणि संघटित राहिल्यास आपला देशही अधिक मजबूत होईल. देशाला परम वैभवावर नेण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदार व शिस्तबद्ध नागरिक बनणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य (घुमंतू कार्य) दुर्गादास व्यास यांनी केले. ते चिखली येथील तालुका क्रीडा संकुल येथे शनिवारी २५ ऑक्टोबर ला आयोजित रा. स्व. संघाच्या चिखली नगराच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय स्टेट बँक चिखली शाखेचे मुख्य प्रबंधक घनश्याम गिरी, तर मंचावर बुलढाणा जिल्हा संघचालक सुभाष मोरे आणि नगर कार्यवाह मिलिंद हिवाळे उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात दुर्गादास व्यास यांनी विविध मुद्द्यांवर भर दिला. भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढत असून उपग्रह तंत्रज्ञान व स्वदेशी संरक्षण शस्त्रे ही त्याची उदाहरणे आहेत. नागरिकांनी परदेशी वस्तूंचा मोह टाळून स्वदेशीचा वापर करावा, असे ते म्हणाले. तसेच, पर्यावरणाच्या रक्षणासाठी पाण्याचा अपव्यय व ‘सिंगल-युज प्लास्टिक’ टाळणे, वाढदिवसाला झाड लावणे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक समरसतेवर बोलताना त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश व चवदार तळ्याचा संदर्भ देत, जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करून समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. प्रभू श्रीरामाचे चारित्र्य अंगीकारल्यास सत्य आणि धर्माचाच विजय होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज संघाचे कार्य देशभरातील १ लाख गावांमध्ये आणि ४० हून अधिक देशांत पोहोचले असून, प्रत्येक स्वयंसेवकाने वर्षभरात एका नव्या व्यक्तीला संघात जोडावे, असेही ते म्हणाले. प्रमुख अतिथी घनश्याम गिरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सेवा, समर्पण आणि त्याग यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. राष्ट्र उभारणीत संघ सदैव अग्रेसर असून ‘संघ म्हणजे शक्ती’ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण, प्रार्थना आणि शस्त्रपूजनाने झाली. यावेळी स्वयंसेवकांनी घोष वादन, विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच सांघिक व वैयक्तिक गीत, सुभाषित आणि अमृतवचनाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व आभार चिखली नगर कार्यवाह यांनी मानले. या उत्सवाला स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129