♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आदिवासी आश्रमशाळांमध्ये पोषणाचा खेळखंडोबा ! प्रशासनाला आठ दिवसांची मुदत अन्यथा आंदोलनाचा इशारा !

MH 28 News Live / डोणगाव : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केला आहे. शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना दररोज मिळणे अपेक्षित असलेले दूध, अंडी, केळी आणि सकस आहार प्रत्यक्षात नियमित मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी परिषदेने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीच्या चौकशीची मागणी केली आहे.

अंडी-केळी आठवड्यातून केवळ दोन दिवस

अकोला आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातून केवळ दोन दिवस अंडी व केळी दिली जात असल्याचा, तर दूध वाटपही अनियमित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पोषक भाजीपाला देण्याऐवजी केवळ डाळीचे पाणी आणि भात दिला जात असल्याचेही परिषदेने म्हटले आहे. हे आरोप सत्य असल्यास विद्यार्थ्यांच्या पोषणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अविनाश पंधरे यांनी अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे सर्व आश्रमशाळांची प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी केली आहे. आहार वाटपाच्या नोंदी, दर्जा आणि खर्चाची पडताळणी करून अनियमितता आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वरिष्ठ स्तरावर आणि प्रसारमाध्यमांसमोर आवाज उठवण्याचा इशारा परिषदेने दिला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129