
MH56 संघटनेच्या पाठपुराव्याला यश ! दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा येथे थांबा; अनुयायांना मोठा दिलासा
MH 28 News Live / ( राहुल चोपडे ) नांदुरा : नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादनासाठी जाणाऱ्या बौद्ध उपासक व अनुयायांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. MH56 प्रादेशिक प्रवासी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर संबंधित विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा (NN) रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदुरा व परिसरातून मोठ्या संख्येने अनुयायी नागपूरला जातात. त्यांच्या प्रवासाची सोय व्हावी, यासाठी पुणे–नागपूर, नाशिक–नागपूर, मुंबई–नागपूर, नागपूर–भुसावळ आणि सोलापूर–नागपूर मार्गावरील विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा येथे तात्पुरता थांबा देण्याची मागणी संघटनेने केली होती.
यासंदर्भात संघटनेने नांदुरा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन व्यवस्थापकांना लेखी निवेदन दिले होते. तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ मंडळ यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने मागणीची दखल घेत थांबा मंजूर केल्याने नांदुरा शहरासह परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अशोकराव घनोकार, सदस्य जितेंद्र थावरानी तसेच पदाधिकारी व सदस्यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. प्रवाशांच्या न्याय्य मागण्यांसाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे अध्यक्ष अशोकराव घनोकार यांनी सांगितले.



