
कमळजा देवीचे मंदिर पाण्याखाली; दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी लोणार पालिकेने पुरवल्या मूलभूत सुविधा
MH 28 News Live / लोणार (राहुल सरदार) : लोणारचे आराध्य दैवत माँ कमळजा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी लोणार नगर परिषदेने सरोवर परिसरात आरओचे शुद्ध, थंड पिण्याचे पाणी आणि फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली आहे. नगराध्यक्ष सौ. मीराताई भूषण मापारी आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण पाटील मापारी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
मूळ मंदिर पाण्याखाली; पर्यायी दर्शनाची व्यवस्था
लोणार सरोवरातील पाणीपातळी वाढल्यामुळे माँ कमळजा देवीचे मूळ मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यात अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून कमळजा माता सेवा संघाने मंदिरालगतच्या खुल्या पटांगणात शेड उभारून देवीची प्रतिमा दर्शनासाठी ठेवली आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असून, नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या काळात गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

स्वच्छतेसह मूलभूत सुविधांना प्राधान्य
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नगर परिषदेने तातडीने शुद्ध, थंड पिण्याचे पाणी आणि फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे विशेषतः महिला भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार असून, परिसरातील स्वच्छता राखण्यासही मदत होणार आहे. फिरत्या शौचालयावर ‘लोणार नगर परिषद, जि. बुलढाणा’ असा उल्लेख असून, ‘स्वच्छ लोणार, सुंदर लोणार’ हा संदेशही देण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगर परिषदेच्या या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत होत आहे.



