
खळबळजनक…! कधी माणूस, कधी जनावर लक्ष्य; अज्ञात वन्यप्राण्याचा धुमाकूळ, अंत्री खेडेकर शिवारात अज्ञात वन्यप्राण्याची दहशत… शेतकरी भयभीत, मजूर धास्तावले; अज्ञात वन्यप्राण्याचा वावर, वनविभागाचे मात्र दुर्लक्ष !
MH 28 News Live / संजय एस. खेडेकर चिखली : अंत्री खेडेकर शिवारात शेतात काम करणाऱ्या ५० वर्षीय इसमावर अज्ञात वन्यप्राण्याने पाठीमागून अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंजाब दगडू मोरे हे पाणी आणण्यासाठी विहिरीजवळ गेले असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अज्ञात वन्यप्राण्याने त्यांच्या पाठीवर अचानक हल्ला केला. हल्ल्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते थेट विहिरीत कोसळले. सुदैवाने त्यांना पोहता येत असल्याने त्यांचा जीव बचावला; मात्र या घटनेमुळे अंत्री खेडेकर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता, तो परिसरात कुठे वावरतो आणि पुढील हल्ला कोणावर होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता नसताना वनविभागाकडून ठोस आणि तातडीची कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पाठीवर हल्ला अन् विहिरीत कोसळले; तासभर मृत्यूशी झुंज
अंत्री खेडेकर येथील पंजाब दगडू मोरे हे संदीप शिवशंकर खेडेकर यांच्या शेतात कामावर होते. काल दुपारी सुमारे बारा वाजता पाणी काढण्यासाठी ते विहिरीकडे गेले असता पाठीमागून अज्ञात वन्यप्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले. हल्ला करणारा प्राणी झुडपांच्या जाळीत दबा धरून बसला असावा, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. हल्ला करणारा हा प्राणी बिबट्या होता की अस्वल होते की आणखी कोणता वन्य पशु होता याबाबत मात्र स्पष्ट कोणालाही माहिती नसल्यामुळे किंवा कोणीही पाहिले नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विहिरीत पडल्यानंतर पोहता येत असल्याने मोरे यांनी आपला जीव वाचवला; मात्र विहिरीतून बाहेर येण्यासाठी त्यांना तब्बल एक तास संघर्ष करावा लागला. त्यानंतर ते जखमी अवस्थेत राजू वासुदेव खेडेकर यांच्या घरी पोहोचले. राजू खेडेकर यांनी त्यांना तातडीने अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. या घटनेने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, यापूर्वीही अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे. एका वासराचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये या प्राण्याबाबत अधिकच भीती निर्माण झाली आहे.
सोयाबीन काढणीचा हंगाम; शेतात जाण्यासही मजूर धजावत नाहीत
सध्या परिसरात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. मात्र अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्याच्या भीतीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. दिवसभर शेतात राहून काढणीची कामे करावी लागत असल्याने प्रत्येक क्षणी वन्यप्राण्याच्या हल्ल्याची भीती मनात ठेवून काम करणे ग्रामीण नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. भीतीमुळे काही शेतमजूर शेतात जाण्यास तयार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची कामे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिकाची काढणी वेळेत झाली नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वन्यप्राण्याची दहशत ही केवळ जीविताच्या सुरक्षेपुरती मर्यादित राहिलेली नसून, थेट शेतीच्या कामांवर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणारी ठरत आहे.
‘आता तरी जागे व्हा’; वनविभागाकडे ग्रामस्थांची आक्रमक मागणी
अज्ञात वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या तक्रारी आणि हल्ल्याच्या घटना समोर येत असताना वनविभागाने केवळ घटना घडल्यानंतर पाहणी करण्यापुरती कारवाई न करता तातडीने ठोस शोधमोहीम राबवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. घटनास्थळाची सखोल पाहणी करून वन्यप्राण्याचे ठसे व अन्य पुरावे तपासावेत, परिसरात आवश्यक ठिकाणी कॅमेरे किंवा पिंजरे लावावेत आणि नागरिकांना सुरक्षिततेबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर उपाययोजना करण्याची वेळ येण्यापूर्वी वनविभागाने हालचाल करणे आवश्यक आहे. वारंवार घटना घडत असतानाही ठोस कारवाईला विलंब होत असेल तर त्यातून ग्रामीण नागरिकांच्या जीविताला धोका वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे वनविभागाने आता तरी डोळे झाकून न बसता खडबडून जागे व्हावे, अज्ञात वन्यप्राण्याचा तातडीने शोध घ्यावा आणि अंत्री खेडेकरसह परिसरातील शेतकरी-शेतमजुरांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



