♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दुष्काळाने जगणे केले मुश्कील; शेतकऱ्यांचा थेट विहिरीत उतरून आक्रोश; जळगाव जामोद तालुक्यात अनोखे आंदोलन; हेक्टरी १ लाख मदतीसह पीकविमा तत्काळ देण्याची मागणी

MH 28 News Live / जळगाव जामोद : बुलढाणा जिल्ह्यावर भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट गडद झाले असून, पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांकडून आंदोलनांचा धडाका सुरू आहे. त्यातच मंगळवारी जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी फाटा येथे आंदोलनाचे अनोखे स्वरूप पाहायला मिळाले. दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलक थेट विहिरीत उतरले.

 

दुष्काळाच्या वेदना दाखवण्यासाठी विहिरीत उतरले आंदोलक

सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, शिवदास खिरोडकार, वैभव जाणे आणि आकाश आटोळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी थेट खोल विहिरीत उतरून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि त्यांच्या मागण्यांची तीव्रता सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

प्रशासनाची धावपळ; आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न

आंदोलक विहिरीत उतरल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, केवळ आश्वासनांऐवजी तातडीने भरीव मदत मिळावी, अशी आंदोलकांची भूमिका आहे.

हेक्टरी एक लाखांची मदत, पीकविम्याची तातडीने मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. तसेच सन २०२४ मधील उर्वरित पीकविमा आणि सन २०२५-२६ चा सरसकट पीकविमा तातडीने वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पीककर्ज वाटप करताना बँकांकडून लावण्यात येणारे किचकट नियम बदलून शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि विनाकारण अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान, ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटकाही अनेक शेतकऱ्यांना बसला असून, शेतातील पिके खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाच्या संकटात भर पडलेल्या या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पीकनुकसान आणि आर्थिक अडचणींच्या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार का, याकडे आता जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129