
दुष्काळाच्या छायेत संवेदनशीलता; वाढदिवसानिमित्त चिखलीचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत
MH 28 News Live / चिखली : सध्या संपूर्ण परिसर दुष्काळाच्या भीषण सावटाखाली सापडला असून, बळीराजा गंभीर आर्थिक आणि मानसिक संकटाचा सामना करत आहे. शेतातील पिके करपून गेली असून, सर्वत्र पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी पाऊले तहानलेली आहेत. अशा या अत्यंत बिकट आणि संवेदनशील परिस्थितीत चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी आपल्या संवेदनशीलतेचा आणि मोठ्या मनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसाचा कोणताही अनावश्यक खर्च न करता, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत १ लाख रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये जमा केला आहे.
दुष्काळाच्या या दाहकतेत सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः शेतकरी बांधव होरपळून निघत आहेत. अशा वेळी राजकीय वा वैयक्तिक स्वरूपाच्या भपकेबाज वाढदिवसाच्या सोहळ्यांना फाटा देऊन, संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका बिडगर यांनी घेतली. शेतकऱ्यांच्या वेदनांची खरी जाणीव मनात बाळगून, मुख्याधिकाऱ्यांनी दाखवलेले हे सामाजिक उत्तरदायित्व अत्यंत भूषणावह ठरले आहे.
शासकीय पदावर कार्यरत असताना केवळ प्रशासकीय कर्तव्य पार न पाडता, समाजातील दुःखाशी नाळ जोडून ठेवणे हे त्यांच्या कृतीतून दिसून आले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पुढाकाराचे संपूर्ण चिखली शहरासह जिल्ह्यातून उत्स्फूर्त कौतुक होत असून, इतर अधिकारी व नागरिकांसाठीही ही कृती एक नवा वस्तुपाठ ठरत आहे.



