
चिखलीत तापाचा कहर; डेंग्यूचा धोका वाढला ! हिवतापाच्या रुग्ण वाढले|; डासांचा वाढता प्रादुर्भाव ठरतोय चिंतेचा विषय
MH 28 News Live / चिखली : मागील चार-पाच दिवसांपासून चिखली शहरात थंडी, ताप, अंगदुखी आणि अशक्तपणाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. महिला, पुरुषांसह लहान मुलांमध्येही तापाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांची गर्दी वाढली असून, काही रुग्णांच्या तपासण्यांमध्ये डेंग्यूसदृश्य लक्षणे आढळून येत असल्याने संभाव्य डेंग्यूच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त होत आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
पावसाळ्यात पाणी साचणे, नाल्यांची अपुरी स्वच्छता, घरांच्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. परिणामी हिवताप आणि डेंग्यू यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे शहरातील डासांची उत्पत्तीस्थळे तातडीने नष्ट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
तापाकडे दुर्लक्ष नको
थंडी वाजणे, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, मळमळ, उलट्या, डोळ्यांच्या मागे दुखणे किंवा त्वचेवर पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार रक्तचाचण्या करून आजाराचे योग्य निदान करून घेणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी घराभोवती पाणी साचू देऊ नये. टायर, कुंड्या, डबे व इतर वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात. मच्छरदाणी व डासप्रतिबंधक साधनांचा वापर करावा.
ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. सतत ताप, वारंवार उलट्या किंवा रक्तस्रावाची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात जावे.
पालिकेची प्रतिबंधात्मक मोहीम
यासंदर्भात पालिकेचे आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे यांनी शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियमित फवारणी केली जात असल्याचे सांगितले. बीएससी पावडरची फवारणी, नाल्यांची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा तसेच कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यास आरोग्य विभागाकडून प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



