♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पावसाने दगा दिला; जलसाठेही आटले… जिल्ह्यावर दुष्काळसदृश संकटाचे सावट खडकपूर्णा प्रकल्पात अवघा ७.४४ टक्के जलसाठा; पावसाअभावी खरीप संकटात

MH 28 News Live / बुलढाणा : वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील खरीप पिके करपण्याच्या स्थितीत आली असून, अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीसाठी सिंचनाचा पर्याय ठरणाऱ्या मोठ्या, मध्यम आणि लघु जलप्रकल्पांमधील पाणीसाठाही समाधानकारक नसल्याचे जलसंपदा विभागाच्या गुरुवारच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मोजक्याच प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा असून, अन्य प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी शिल्लक आहे.

खडकपूर्णाची स्थिती चिंताजनक

जिल्ह्यात नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा हे तीन मोठे जलसंपदा प्रकल्प आहेत. यापैकी खडकपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती यंदा विशेष चिंताजनक आहे. या प्रकल्पाची संकल्पित जलसाठा क्षमता ९३.४० दशलक्ष घनमीटर असताना सध्या केवळ ६.९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या अवघा ७.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

सिंचनासह पाणीपुरवठ्यावर परिणामाची शक्यता

खडकपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या कालवा सिंचन, उपसा सिंचन तसेच पेयजल पुरवठा योजनांसमोर आगामी काळात आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रात यावर्षी आतापर्यंत ३४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

प्रकल्पनिहाय पावसाची असमान स्थिती

जलसंपदा विभागाच्या नोंदीनुसार, विविध प्रकल्पांच्या क्षेत्रात यावर्षी झालेला पाऊसही मोठ्या प्रमाणात असमान आहे. नळगंगा प्रकल्प क्षेत्रात ३२० मिलिमीटर, खडकपूर्णा ३४८, पेनटाकळी ६५६, पलढग २९१, ज्ञानगंगा ३७७, कोराडी ६९३, उतावली ३२१, मस ३४५, तोरणा २५८, तर मन प्रकल्प क्षेत्रात २५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आगामी काळासाठी पाणी नियोजनाची गरज

काही प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात तुलनेने चांगला पाऊस झाला असला तरी त्याचा अपेक्षित परिणाम सर्वच जलसाठ्यांवर झालेला दिसत नाही. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी संकटात असताना जलसाठाही मर्यादित असल्याने आगामी रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, सिंचनासाठी कार्यक्षम वापर आणि संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129