
राहुल गांधींचा फोन अन् बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला ! शेवटच्या क्षणी बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ‘काँग्रेस सोडणार नाही’चा भावनिक निर्धार !
MH 28 News Live / चिखली : राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित नसते, याचा प्रत्यय चिखलीच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा येताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या २२ सप्टेंबरच्या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची आणि त्यानंतर बोंद्रे यांच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. बोंद्रे यांनी स्वतः सोशल मीडियावर भूमिका मांडत भाजपमध्ये जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहितीही प्रसिद्ध झाली होती.
सपकाळांचा प्रयत्न अन् थेट राहुल गांधींचा फोन ?
दरम्यान, बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर पक्षातील वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी थेट संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. दुपारच्या सुमारास झालेल्या या दूरध्वनी संभाषणात काँग्रेस सोडू नका, पक्षाच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आवाहन राहुल गांधी यांनी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या संवादादरम्यान बोंद्रे भावूक झाल्याची आणि त्यांनी आपल्या जुन्या राजकीय संबंधांचा उल्लेख करत काँग्रेससोबतच राहण्याची भूमिका व्यक्त केल्याची माहिती पुढे येत आहे. ‘माझे सर्व काही गेले तरी चालेल; मात्र काँग्रेस सोडणार नाही, मी तुमच्यासोबत राहीन,’ अशा आशयाची भावना त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संभाषणाची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.
२२ सप्टेंबरचा प्रवेश आता रद्द ?
या अचानक घडलेल्या घडामोडींनंतर राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे उद्या मुंबईत होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशाचे नेमके काय होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, २० आणि २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय कायम असल्याचे नमूद करण्यात आले होते.
जर बोंद्रे यांनी खरोखरच भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतला असेल, तर बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात त्याचे पुढील परिणाम काय होतात, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यास बोंद्रे यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे ‘बोंद्रे भाजपमध्ये जाणार की पुन्हा काँग्रेससोबतच राहणार?’ या प्रश्नाचे उत्तर आता काही तासांतच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



