
चिखली बसस्थानकात बसचा धक्का; वृद्ध महिला गंभीर जखमी हात चाकाखाली आल्याने खळबळ; शेख शमशेर आणि कपिल लोखंडे यांनी महिलेला बाहेर काढून रुग्णालयात केले दाखल
MH 28 News Live / चिखली : बसस्थानकात बार्शी येथून शेगावकडे जाणारी बस आगारात प्रवेश करत असताना एका वयोवृद्ध महिलेला धडक लागून अपघात झाला. या दुर्घटनेत महिलेचा हात बसच्या चाकाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.

निर्मला आनंदाराव देशमुख (वय अंदाजे ७५ वर्षे, रा. धोत्रा भंणगोजी, ता. चिखली) असे जखमी महिलेचे नाव आहे. बार्शी आगाराची शेगावकडे जाणारी बस चिखली आगारात प्रवेश करत असताना हा अपघात घडला. सदर बसचे चालक एस. डी. बांगर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातानंतर एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शेख शमशेर आणि कपिल लोखंडे यांनी तत्परता दाखवत बसखाली अडकलेल्या महिलेला बाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसस्थानकात बसची ये-जा सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून पुढील तपशीलानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



