♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मोकाट कुत्र्यांचा हैदोस होईपर्यंत नगरपालिका झोपली होती का ? नागरिकांच्या आक्रोशानंतरच प्रशासनाला जाग; देऊळगाव राजात अखेर कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू

 

MH 28 News Live / देऊळगाव राजा : शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट, रस्त्यांवरील वाहतुकीला होणारा अडथळा आणि लहान मुलांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न याकडे नगरपालिका प्रशासनाने वेळेत लक्ष का दिले नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक त्रस्त असताना, सातत्याने मागण्या आणि समाजमाध्यमांवरील तक्रारींनंतर अखेर नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून शहरात भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

शहरातील प्रमुख रस्ते, बसस्थानक, चौक आणि विविध प्रभागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला होता. रस्त्यावर अचानक कुत्री आडवी येत असल्याने दुचाकीस्वारांना अपघातांचा धोका निर्माण झाला होता. काही दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटनाही घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच लहान मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्यांची भीती असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्यावरून जाताना सावधगिरी बाळगावी लागत होती. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतानाही या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत होती.

‘हेल्प देऊळगाव राजा’च्या मागणीची दखल

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर समाजमाध्यमांवरही नागरिकांनी आवाज उठवला. ‘हेल्प देऊळगाव राजा’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली. नागरिकांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नगरपालिका प्रशासनाने अखेर कार्यवाही सुरू केली. नगराध्यक्ष शिपणे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी संबंधित विभागाला मोकाट कुत्रे पकडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एका एजन्सीच्या माध्यमातून शहरातील बसस्थानक, प्रमुख चौक आणि विविध भागांमध्ये कुत्री पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

मोहीम सुरू झाली; कायमस्वरूपी उपाय कधी ?

नगरपालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी केवळ काही कुत्री पकडून प्रश्न सुटणार नाही. शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविणे, भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमांनुसार उपाययोजना करणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार असेल, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळे सुरू झालेली मोहीम केवळ तात्पुरती कारवाई ठरू नये, तर देऊळगाव राजा शहरातील नागरिकांना या त्रासातून दिलासा मिळेपर्यंत नगरपालिका प्रशासनाने सातत्याने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129