♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गोद्री परिसरात वाघाची अफवा; बिबट्याचा वावर स्पष्ट! वनविभागाच्या सर्च ऑपरेशनमध्ये वाघाच्या खुणा नाहीत; साकेगाव, वाघापूर, माळशेंबा परिसरात बिबट्याचे पाऊलठसे आढळले

MH 28 News Live / चिखली : चिखली तालुक्यातील मौजे गोद्री परिसरात शेतात वाघ आढळल्याच्या माहितीने परिसरात खळबळ उडाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वनविभागाच्या अधिकारी आणि रेस्क्यू टीमने शुक्रवारी रात्रीपासून युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन राबवले. मात्र, सखोल पाहणीदरम्यान वाघाच्या अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत. उलट, गोद्री परिसरात बिबट्याने झाडाच्या खोडावर नखांनी ओरबाडल्याच्या खुणा आणि बिबट्याची विष्टा आढळली. तसेच साकेगाव, वाघापूर आणि माळशेंबा परिसरात बिबट्याचे स्पष्ट पाऊलठसे मिळाल्याने या भागात वाघाऐवजी बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

बुलढाणा प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुम्मी वर्तुळ अधिकारी तथा वनपाल बकाल, वनरक्षक वायाळ, गायके, ए. जी. शिंदे, नितेश गवई, जी. आर. शिंदे तसेच रेस्क्यू टीमचे संदीप मडावी आणि अमोल चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर परिसराची तपासणी केली. गोद्री गावात वनविभागाच्या वतीने दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले. उन्हाळ्यात पाणी आणि अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एआयच्या माध्यमातून तयार केलेले वाघाचे बनावट फोटो प्रसारित करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वनविभागाने निदर्शनास आणून दिले आहे. वाघ आल्याची माहिती अफवा असल्याचे स्पष्ट करत अशा खोट्या बातम्या आणि फोटो पुढे पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे.

वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता शेतकरी आणि पशुपालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जनावरे सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी बांधावीत आणि रात्रीच्या वेळी त्यांना उघड्यावर सोडू नये. शेतात कामासाठी जाताना एकट्याने जाणे टाळून शक्यतो समूहाने जावे. परिसरात वनविभागाकडून सातत्याने पाहणी सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. बिबट्या किंवा अन्य वन्यप्राण्याची संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून जवळ जाण्याऐवजी तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129