♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गाढवांचे भाव घसरले ! देऊळगाव राजा यात्रेतील ऐतिहासिक बाजारात मंदीचे सावट; तीन दिवसांत केवळ ५९ गाढवांची खरेदी-विक्री

MH 28 News Live / देऊळगाव राजा : साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराज यात्रेतील गाढवांचा बाजार यंदा आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडला आहे. व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने पिण्याचे पाणी, दिवाबत्ती आणि गाढवांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली; मात्र बाजारात अपेक्षित गर्दी आणि उलाढाल झालीच नाही. सुमारे १०० ते १५० गाढवे विक्रीसाठी दाखल झाली असताना तीन दिवसांत अवघ्या ५९ गाढवांची खरेदी-विक्री झाली. त्यामुळे सुविधा उपलब्ध होऊनही बाजारातील मंदी दूर करण्यात यश आले नसल्याचे चित्र समोर आले आहे.

 

श्री बालाजी महाराजांच्या कार्तिक यात्रोत्सवात घोडे, गाढवे आणि बैलगाड्यांचे बाजार भरण्याची परंपरा आहे. काळाच्या ओघात बैलगाडीचा बाजार नामशेष झाला, तर घोड्यांच्या बाजाराचीही घसरण झाली. अशा परिस्थितीत गाढवांचा बाजार ही ऐतिहासिक परंपरा टिकवून आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती आणि मोठ्या व्यापाऱ्यांची अनुपस्थिती यांचा बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून आले. मढी, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक व्यापाऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याने विक्रेत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.

यापूर्वी बाजारात पाणी, प्रकाश आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून केली जात होती. यंदा या तक्रारींची दखल घेत श्री बालाजी संस्थान, यात्रोत्सव जागावाटप समिती आणि नगरपालिका प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन गाढवांच्या चाऱ्याची व्यवस्थाही संस्थानतर्फे करण्यात आली. संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, जागावाटप समितीचे जगदीश कापसे, सुरज गुप्ता, गोविंद झोरे, सुनील शेजुळकर, वसंतअप्पा खुळे, निशिकांत भावसार आणि स्थानिक व्यापारी जानराव गायकवाड यांनी बाजाराला भेट देऊन सुविधांची पाहणी केली तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला.

यंदा बाजारात गाढवांचे दर किमान आठ हजारांपासून कमाल वीस हजार रुपयांपर्यंत राहिले. मेहकर, चिखली, बुलढाणा, अकोला, पैठण, शेंदुर्णी, जळगाव जामोद, नेवासा, कोल्हापूर, गंगाखेड आदी भागांतील व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीत सहभाग घेतला. मात्र, मोठ्या व्यापाऱ्यांची अनुपस्थिती आणि कमी व्यवहार यामुळे बाजाराची आर्थिक उलाढाल मर्यादित राहिली.

“दरवर्षी या बाजारात गाढवे विक्रीसाठी आणतो. यंदा खरेदी-विक्री अत्यल्प झाल्याने आर्थिक गणित बिघडले. अपेक्षेप्रमाणे कमाई झाली नसली, तरी संस्थान आणि नगरपालिका प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिल्याने पुढील वर्षीही बाजारात येण्याचे प्रोत्साहन मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया चिखली येथील गाढवांचे व्यापारी बजरंग माने यांनी दिली.

 

ऐतिहासिक परंपरा टिकविण्यासाठी केवळ सुविधा पुरेशा नाहीत, तर बाजारातील आर्थिक व्यवहार वाढविण्यासाठीही प्रयत्नांची गरज असल्याचे यंदाच्या मंदीने अधोरेखित केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129