
अभिमानास्पद…! समुद्राच्या कुशीत विश्वविजय ! बुलढाण्याच्या इराचे वयाच्या दहाव्या वर्षी स्कुबा डायव्हिंगमध्ये सहा विश्वविक्रम… १७ तास ३५ मिनिटांत स्कूबा डायव्हिंगमध्ये सहा जागतिक विक्रमांची नोंद; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
MH 28 News Live / बुलढाणा : वय अवघे दहा वर्षे, पण जिद्द मात्र आभाळाला गवसणी घालणारी ! समुद्राच्या अथांग पाण्याखाली साहसाचा थरार अनुभवत बुलढाण्याच्या कन्या इरा आदित्य राऊत हिने एकाच दिवशी तब्बल सहा विश्वविक्रमांची नोंद करून जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी तिने केलेली ही असामान्य कामगिरी केवळ बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे. १८ ऑक्टोबर रोजी अवघ्या १७ तास ३५ मिनिटांच्या कालावधीत सहा विश्वविक्रमांची नोंद करीत इराने बालवयातच साहस, जिद्द आणि आत्मविश्वासाचा नवा आदर्श निर्माण केला.

इरा ही भारतीय नौदलात कार्यरत कमांडर स्नेह बुडाकोटी आणि कमांडर आदित्य राऊत यांची कन्या आहे. कर्नाटकातील कारवार येथील नेव्हल चिल्ड्रन स्कूलमध्ये ती इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच साहसी क्रीडा क्षेत्रातही तिने मिळविलेली ही झेप तिच्या धाडसाची आणि कठोर परिश्रमांची साक्ष देणारी आहे.
अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील शहीद द्वीप येथील डाइव्ह ट्राइब सेंटरमध्ये १८ ऑक्टोबरला इराचे स्कूबा डायव्हिंगचे साहसी उपक्रम पार पडले. समुद्राच्या पाण्याखालील आव्हानात्मक वातावरणात कौशल्य, एकाग्रता आणि धैर्य यांची कसोटी लागते. अशा परिस्थितीत अवघ्या दहा वर्षांच्या इराने दाखविलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे. तिच्या स्कूबा डायव्हिंग पात्रतेला स्कूबा स्कूल्स इंटरनॅशनल या संस्थेने प्रमाणित केले, तर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अरविंदर सिंह भट्टी यांनी तिच्या सहा विश्वविक्रमांची पडताळणी केली.
लहान वयातच जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या इराच्या या यशातून नव्या पिढीतील अमर्याद क्षमता अधोरेखित झाली आहे. ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केले, तर वयाची मर्यादाही मोठ्या स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही, हा संदेश तिच्या कामगिरीतून मिळतो. इराच्या या साहसी यशामुळे बुलढाण्याच्या नावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली असून, तिच्या पुढील वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
समुद्राच्या अथांग खोलीतून विश्वविक्रमांचा झेंडा उंचावणाऱ्या इरा राऊतच्या कर्तृत्वाने बुलढाण्याच्या भूमीचा गौरव जागतिक क्षितिजावर पोहोचविला आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यात ती साहसी क्रीडा क्षेत्रात आणखी मोठी शिखरे सर करो, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.



