♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Crime News अमडापूरचा राहुल बनला तोतया पोलीस; छत्रपती संभाजीनगरमध्ये पडल्या बेड्या

MH 28 News Live / चिखली : ठाणे शहर पोलिस दलात भरती झाल्याचा बनाव, सोलापूर येथे प्रशिक्षण पूर्ण केल्याची बतावणी आणि खेळाच्या स्पर्धेचे कारण सांगत छत्रपती संभाजीनगरातील लॉजवर तब्बल दहा दिवस मुक्काम करणाऱ्या तोतया पोलिसाचा सिटीचौक पोलिसांनी पर्दाफाश केला. राहुल रोहिदास सातकर (३१, रा. अमडापूर, मेहकर रोड, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांच्या नावाची बनावट ओळखपत्रे, चार वेगवेगळ्या हुद्द्यांच्या नेमप्लेट, बनावट नियुक्तिपत्र आणि पोलिसांच्या वापरातील गणवेशासह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

बारावी नापास, पण पोलिसांचा रुबाब!

आरोपी राहुल सातकर हा बारावी नापास असून, यापूर्वी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काम करत होता. हॉटेलमधील काम सोडल्यानंतर लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्याने पोलिस असल्याचे भासवण्याचा मार्ग निवडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांप्रमाणे केशरचना, पिळदार शरीरयष्टी, रुबाबदार चालणे आणि बोलण्यातील तोरा यामुळे तो खराखुरा पोलिस अंमलदार असल्याचा आभास निर्माण करत होता. त्यामुळे त्याच्यावर सहजासहजी संशय येत नव्हता.

खेळाच्या स्पर्धेचा बहाणा, दहा दिवस लॉजवर मुक्काम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री राहुल सातकर हा सिटीचौक परिसरातील सिटीझन हॉटेल व लॉजमध्ये आला. आपण ठाणे शहर पोलिस दलात कार्यरत असून, खेळाच्या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरात आल्याचे त्याने सांगितले. गळ्यात महाराष्ट्र पोलिसांची लेस असलेले ओळखपत्र दाखवून त्याने लॉजमध्ये खोली मिळवली. त्यानंतर तो गेल्या दहा दिवसांपासून तेथे मुक्काम करून शहरात वावरत होता.

दरम्यान, त्याच्या संशयास्पद हालचालींची माहिती सिटीचौक पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सिटीझन लॉजवर धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने केलेला बनाव उघड झाला. पोलिस असल्याचे भासवून खाकी वर्दीचा रुबाब दाखवण्यासाठी आणि फसवणुकीच्या हेतूने हे साहित्य वापरत असल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चार नेमप्लेट, दोन बनावट ओळखपत्रे अन् संपूर्ण पोलिस किट

आरोपीच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना बनावट कागदपत्रांसह पोलिसांच्या वापरातील साहित्याचा मोठा साठा आढळून आला. त्यामध्ये एकाच नावाच्या वेगवेगळ्या हुद्द्यांच्या चार नेमप्लेट, महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेली नेमप्लेट, पोलिसांची लेस असलेली दोन बनावट ओळखपत्रे आणि ठाणे शहर पोलिस दलाचे बनावट नियुक्तिपत्र आढळले. याशिवाय पूर्ण खाकी वर्दी, पोलिस डांगरी ड्रेस, महाराष्ट्र पोलिस ट्रॅक सूट, अधिकृत पिवळ्या रंगाचा रेनकोट, कमांडो व क्यूआरटीचे टी-शर्ट, कमरेचे पिस्तूल पाऊच, पोलिसांच्या कॅप, परेड अँकलेट, हँडग्लोव्हज, बेल्ट, बूट, दोन मोबाईल, ट्रॉली बॅग आणि विविध बनावट कागदपत्रांची फाइल पोलिसांनी जप्त केली. विविध क्रीडा व शैक्षणिक प्रमाणपत्रांचाही त्याने बनावासाठी वापर केल्याचे समोर आले आहे.

दुचाकी चोरीचे गुन्हे; बुलढाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद

राहुल सातकर याच्यावर यापूर्वी सिटीचौक पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच बुलढाणा जिल्ह्यात त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्याचीही नोंद आहे. त्यामुळे बनावट पोलिस बनून शहरात वावरणाऱ्या या आरोपीच्या कारवायांची गंभीरता अधोरेखित झाली आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सानप, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक संजय राठोड, मुनीर पठाण, हेडकॉन्स्टेबल आनंद वाहुळ, पोलिस अंमलदार मंगेश पंडित आणि संदीप भोटकर यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या वेशभूषेचा आणि ओळखीचा गैरवापर करून लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129