
मतदारांना दिलासा ! दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार; नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी वाढीव मुदतीचा लाभ घ्या !
MH 28 News Live / बुलढाणा : प्रारूप मतदार यादीतील नावांबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता पात्र नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. मात्र, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, ती पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबतची माहिती उपजिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.
नाव नोंदणी आणि दुरुस्तीसाठी संधी
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील नोंदी तपासून नाव समाविष्ट करणे, नाव किंवा अन्य तपशिलांमध्ये दुरुस्ती करणे तसेच चुकीच्या नोंदींबाबत हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना मुदत देण्यात आली होती. आता या प्रक्रियेसाठीची मुदत वाढविण्यात आल्याने संबंधित नागरिकांना आपले दावे व हरकती दाखल करण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे.
१० नोव्हेंबरपर्यंत हरकतींचा निपटारा
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर नोटीस टप्पा आणि प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
दरम्यान, मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची नागरिकांनी खात्री करून घ्यावी. नाव वगळले गेले असल्यास किंवा नोंदींमध्ये त्रुटी आढळल्यास निर्धारित प्रक्रियेनुसार आवश्यक अर्ज आणि कागदपत्रांसह दावे किंवा हरकती विहित मुदतीत सादर कराव्यात. वाढीव मुदतीचा लाभ घेऊन मतदारांनी आपली नोंद अचूक असल्याची खात्री करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.



