
हजार रुपयांच्या बिलावरून राडा ! डॉक्टरांसह तिघांविरुद्ध गुन्हा; महिलेचा नकाब ओढल्याचा आरोप; केबिनमध्ये नेमकं काय घडलं ?
MH 28 News Live / चिखली : सर्पदंशग्रस्त रुग्णाच्या उपचारांचे हजार रुपयांचे बिल बाकी राहिल्याने सुरू झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये झालेल्या वादादरम्यान पतीला चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तर त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीचा नकाब ओढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चिखली शहरातील प्रतिथयश डॉक्टर डॉ. सुहास खेडेकर यांच्यासह तिघांविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, रुग्णाच्या नातेवाइकांनी बिल अंगावर फेकून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रतिआरोप डॉक्टरांनी केला असून, ‘अॅक्शनची रिअॅक्शन होती’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
२४ हजार भरले, हजार रुपयांवरून वाद पेटला !
फिर्यादी महिलेच्या मोठ्या भावाला २५ नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाल्याने चिखलीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज मिळणार असल्याने फिर्यादी महिला आणि तिचे पती रुग्णालयात गेले. पतीने औषधांचे २४ हजार १२७ रुपये ऑनलाइन भरले. त्यानंतर रुग्णालयाचे स्वतंत्र ११ हजार रुपयांचे बिल सांगण्यात आले. त्यापैकी १० हजार रुपये भरून उर्वरित एक हजार रुपये काही वेळात देतो, असे पतीने सांगितल्यावर बिलाच्या रकमेसंदर्भात डॉक्टरांच्या केबिनमध्ये वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. केबिनमधून आवाज ऐकून महिला आत गेली असता, डॉक्टर पतीला शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे तिने पाहिल्याचा आरोप केला आहे. पतीला मारहाण करू नका, असे म्हणत मध्यस्थी केल्यावर धक्काबुक्की करून चेहऱ्यावरील बुरख्याचा नकाब जाणीवपूर्वक ओढण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या झटापटीत तिच्या मानेवर ओरखड्याची जखम झाली असून, या कृत्यामुळे आपल्याला लज्जा उत्पन्न झाल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
बिल अंगावर फेकले, कर्मचाऱ्यांना मारहाण केली’; डॉक्टरांचा प्रतिआरोप
वाद सोडवण्यासाठी आलेल्या सर्पदंशग्रस्त भावालाही डॉक्टर आणि केबिनमध्ये उपस्थित इतरांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली, तसेच सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या बाहेरगावी असल्याचे सांगत डॉ. खेडेकर यांनी दूरध्वनीवरून आपली बाजू मांडली. बिलाच्या रकमेत आधीच कपात करण्यात आली होती. तरीही रुग्णाच्या नातेवाइकांनी वाद घालत अंगावर बिल फेकले आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला. “माझ्या रुग्णालयात आणि केबिनमध्ये सीसीटीव्ही आहेत. संपूर्ण प्रकार त्यात कैद झाला असून, फुटेज पोलिसांना देणार आहे. ही अॅक्शनची रिअॅक्शन होती, एवढेच माझे म्हणणे आहे,” अशी प्रतिक्रिया डॉ. खेडेकर यांनी दिली. तक्रार दाखल झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांकडूनच मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
एफआयआरनुसार, ही घटना २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान घडली. त्याच दिवशी सायंकाळी ५.२१ वाजता चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४५/२०२६ नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विजय प्रकाश गिते पुढील तपास करीत आहेत.



