
पाच जणांना बनावट गुंठेवारी आदेशाने प्लॉट विकणाऱ्या आरोपीवर चिखलीत गुन्हा दाखल !
MH 28 News Live / चिखली : चिखली नगर परिषदेचे बनावट गुंठेवारी आदेश तयार करून त्यांचा आधार घेत भूखंड विक्रीचे व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर परिषदेच्या अधिकृत अभिलेखात अस्तित्वात नसलेल्या आदेशांचा वापर करून शासनाची, नगर परिषद प्रशासनाची तसेच नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सुखदेव रायभान जाधव, रा. चिखली, यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषद नगर रचना सहायक कांचन हिरामण राठोड यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकारामुळे भूखंड खरेदी-विक्री व्यवहारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाच जणांना नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विक्री
चिखली भाग एक येथील सर्व्हे क्रमांक १२०/२/० मधील जमिनीच्या व्यवहारात गुंठेवारी आदेश क्रमांक २८३९/२०१२, दिनांक २४ ऑगस्ट २०१२ तसेच जावक क्रमांक २७३०/२०१२, दिनांक १२ ऑगस्ट २०१२ असे दस्तऐवज बनावट तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांचा आधार घेत सह दुय्यम निबंधक कार्यालय, चिखली येथे खरेदीखताचे व्यवहार करण्यात आले. सदर भूखंड ११ सप्टेंबर २०२५ रोजी तसेच त्यानंतर अहमद खान महेमुद खान, नगमा बी शेख आरिफ, जाहिदा गयासोदीन अहमद सैय्यद, शशिकला प्रल्हाद साबळे आणि लक्ष्मी लक्ष्मण माडुकर या पाच जणांना नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विक्री करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. नगर परिषद कार्यालयात संबंधित व्यवहाराबाबत अर्ज प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली असता, नमूद गुंठेवारी आदेश आणि जावक क्रमांकाचे कोणतेही आदेश नगर परिषदेतून निर्गमित झाले नसल्याचे स्पष्ट झाले.
नोटीसनंतर खुलासा नाही; पोलिसांत तक्रार
या प्रकरणी सुखदेव जाधव यांना आपली बाजू मांडण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने नोटीस बजावली होती. त्यांनी आजारी असल्याचे कारण देत २८ मार्च २०२६ रोजी कार्यालयात उपस्थित राहून खुलासा करण्याचे लेखी कळविले; मात्र त्यानंतर कार्यालयात उपस्थित राहून खुलासा सादर केला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. बनावट दस्तऐवज तयार करून शासन व नगर परिषद प्रशासनाची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुख्याधिकारी यांच्या प्राधिकृत पत्रानुसार तसेच बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परवानगीने नगर रचना सहायक कांचन राठोड यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी चिखली पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३३६(३), ३३८ आणि ३४० अन्वये प्रथम खबर क्रमांक ०८८७ नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस निरीक्षक भूषण रामराव गावंडे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार कडुबा भास्कर मुंडे करीत आहेत.



