♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भोगवटा प्रमाणपत्र दिले अन् पंधरा दिवसांत रद्द केले ! अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय प्रकरणी राहुल बोंद्रे आक्रमक… राजकीय दबावापोटी प्रशासनाने ही कारवाई केल्याचा आरोप

 

MH 28 NEWS Live / चिखली : येथील अनुराधा नगरमधील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय व इतर शैक्षणिक इमारतींच्या बांधकामांना नियमाकुल करण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत मोठे नाट्यमय वळण आले आहे. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी तहसीलदार तथा नियोजन प्राधिकारी, चिखली यांनी संस्थेला भोगवटा प्रमाणपत्र दिले; मात्र अवघ्या पंधरा दिवसांत, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याच तहसीलदारांनी हे प्रमाणपत्र रद्द करण्याचे पत्र जारी केले. या कारवाईमागे राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी हिरकणी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. संस्थेने सर्व नियम, कागदपत्रे आणि आवश्यक चलनांची पूर्तता करून सहकार्य केले असतानाही प्रशासकीय स्तरावर विलंब आणि त्यानंतर प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

२०१६ च्या रीजनल प्लॅननुसार नियमाकुलतेची प्रक्रिया; न्यायालयाने दंड रद्द केला

२०१६ मध्ये लागू झालेल्या रीजनल प्लॅननुसार अनुराधा नगरमधील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय आणि अन्य इमारतींसाठी नव्या नियमानुसार परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेने सुरू केली. या बांधकामांना नियमाकुल करण्यासाठी संस्थेने २०२२ मध्ये अर्ज दाखल केला. मात्र नगररचना विभागाकडून संस्थेला कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे पत्र मिळाले. या दंडाला आव्हान देण्यासाठी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी उच्च न्यायालयाने संबंधित दंड रद्द ठरवला. न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संस्थेने नाममात्र दंड भरून पुढील प्रक्रिया सुरू केली. तहसील कार्यालय आणि नगररचना विभागाने शासकीय नियमानुसार कार्यवाही केली, तर संस्थेनेही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत चलन भरून प्रक्रियेत सहकार्य केले, असे राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले.

चार आठवड्यांची प्रक्रिया आठ महिन्यांत; प्रमाणपत्र मिळताच रद्द !

नियमांनुसार बांधकाम परवानगीसंदर्भातील प्रक्रिया चार आठवड्यांत पूर्ण होणे अपेक्षित असताना तहसीलदार कार्यालयाने तब्बल आठ महिने विलंब लावल्याचा आरोप संस्थेने केला आहे. अखेर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी संस्थेला भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आले. मात्र प्रमाणपत्र जारी करणाऱ्या त्याच तहसीलदारांनी अवघ्या पंधरा दिवसांत, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी ते रद्द करण्याचे पत्र संस्थेला दिले. प्रमाणपत्र रद्द करताना ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे. मात्र भोगवटा प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याचा कोणताही नियम नसल्याचा दावा राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. एकीकडे नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण करून प्रमाणपत्र देण्यात आले आणि दुसरीकडे त्याच प्रमाणपत्राला अल्पावधीत रद्द करण्यात आल्याने प्रशासकीय निर्णयाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सत्ताधाऱ्यांच्या दबावातून आकसपूर्ण कारवाई’; अधिकाऱ्यांविरोधात संघर्षाची भूमिका

तहसीलदार तथा नियोजन प्राधिकारी, चिखली यांच्या २० नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशात भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया नमूद करण्यात आली असून, संबंधित संस्थेला बीपीएमएस (Building Plan Management System) प्रणालीवर नव्याने ऑनलाइन अर्ज दाखल करून आवश्यक कागदपत्रांसह पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मौजे सावारगाव डुकरे येथील गट क्रमांक ११७ व ११८, नवीन गट क्रमांक ११७/१/१, ११७/१/२ व ११७/१/३ मधील बांधकामाचा हा विषय असून, एकूण प्लॉट क्षेत्रफळ ३३ हजार चौरस मीटरपैकी १३ हजार ९०० चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम असल्याचा आदेशात उल्लेख आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ तसेच UDCPR २०२० मधील तरतुदींचा संदर्भ देण्यात आला आहे. मात्र नगररचना विभाग आणि तहसीलदारांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून आकस बुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला. राजकीय दबावातून नियमबाह्य कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आपण ठाम भूमिका घेणार असून, संस्थेच्या न्यायासाठी पुढील लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाची कायदेशीर वैधता, ऑनलाइन अर्जाची अट आणि संपूर्ण प्रक्रियेत झालेला विलंब याबाबत आता प्रशासकीय तसेच राजकीय स्तरावर वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक करून आभार मानले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते मोहम्मद इसरार आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोपाल देव्हडे उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129