
घाटबोरीत कर्जमाफीमध्ये होतोय भेदभाव ! बँकेकडून कथित बोगस शेतकऱ्यांना लाभ; पात्र गरजू शेतकरी मात्र वंचित… चौकशीसाठी सहकार आयुक्तांकडे धाव
MH 28 News Live / डोणगाव : शासनाकडून कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना पात्र शेतकरी मात्र प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहत असल्याचा गंभीर प्रकार मेहकर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या घाटबोरी शाखेबाबत समोर आला आहे. लोणीगवळी येथील शेतकरी सखाराम शंकरराव काळदाते यांनी शाखेच्या व्यवस्थापकांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करीत सहकार आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळता कथित बोगस कर्जधारकांना लाभ दिल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्जमाफीच्या यादीत नाव गायब!
सखाराम काळदाते यांनी २०१५-१६ मध्ये शेतीसाठी पीककर्ज घेतले होते. मात्र, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान आणि आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. परिणामी, कर्ज थकीत झाले. शासनाच्या कर्जमाफी योजनांमुळे कर्जाच्या बोजातून मुक्त होण्याची आशा असताना लाभार्थी यादीत आपले नाव समाविष्ट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी घाटबोरी शाखेच्या व्यवस्थापकांकडे वारंवार पाठपुरावा केला; मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
बोगस कर्जधारकांना लाभ दिल्याचा खळबळजनक आरोप
घाटबोरी शाखेच्या कारभारातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे कथित बोगस कर्जधारकांची नावे कर्जमाफीच्या लाभार्थी यादीत समाविष्ट करून त्यांना लाभ मिळवून दिल्याचा आरोप काळदाते यांनी केला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी शाखेतील कर्जमाफीच्या नोंदी, लाभार्थ्यांच्या याद्या, कर्जखाती आणि संबंधित कागदपत्रांची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवून अपात्र व्यक्तींना लाभ दिला असल्यास हा प्रकार शेतकऱ्यांच्या हक्कांवर अन्याय करणारा ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
१८ नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या निवेदनातून काळदाते यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी केली आहे. संबंधित बँक व्यवस्थापक आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला असून, या तक्रारीच्या अनुषंगाने घाटबोरी बँक शाखेच्या कारभाराकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.



