
इमारत सज्ज, सुविधा गायब ! चार महिन्यांपासून नांदुरा बसस्थानकाचे लोकार्पण रखडले…. MH 56 प्रादेशिक प्रवासी संघटनेचे निवेदन
MH 28 News Live / नांदुरा : नांदुरा बसस्थानकाची नवीन इमारत उभी राहून जवळपास चार महिने उलटले, मात्र अद्याप अधिकृत लोकार्पण झाले नसल्याने प्रवाशांना नव्या सुविधांचा लाभ मिळत नाही. त्यातच बसचे फलाट क्रमांक, येण्या-जाण्याच्या वेळा आणि महत्त्वाच्या सूचनांसाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे कार्यान्वित नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रलंबित सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी MH 56 प्रादेशिक प्रवासी संघटना, नांदुरा यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभाग नियंत्रकांकडे निवेदन सादर केले आहे.
नवीन इमारत, पण प्रवाशांची गैरसोय कायम
नवीन बसस्थानकाची इमारत पूर्ण झाली असली, तरी प्रवाशांना बसच्या फलाट क्रमांकाची माहिती, बस येण्याची व सुटण्याची वेळ, मार्गातील बदल आणि अन्य महत्त्वाच्या सूचना वेळेवर मिळत नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बसस्थानकात कायमस्वरूपी ध्वनिक्षेपक यंत्रणा कार्यान्वित करून नियंत्रण कक्षातून नियमित सूचना प्रसारित कराव्यात, तसेच संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवून ते सुरू करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सुरक्षितता आणि वाहतूक नियोजनाला प्राधान्य द्या !
बसचालक व वाहकांना नियंत्रण कक्षातून आवश्यक सूचना देऊन बस वाहतुकीचे नियोजन व समन्वय साधावा, गर्दीच्या वेळी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सूचना देण्याची व्यवस्था असावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. हरवलेल्या वस्तू, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी विशेष सूचना प्रसारित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यावर संघटनेने भर दिला आहे. शासनाच्या निधीतून उभारलेली इमारत केवळ बांधकामापुरती मर्यादित न राहता प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक राव घनोकार, सचिव अनुज मुंढडा यांच्यासह उपाध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी प्रवाशांच्या हितासाठी मागण्या मांडल्या असून, संबंधित विभागाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



