♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हात फिरवला डोक्यावर, डल्ला मारला खिशावर ! १० हजार रुपये लुबाडून भोंदू बाबा झाला फरार….

 

MH 28 News Live / डोणगाव : संभाजीनगरला जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळीक साधत आशीर्वाद देण्याच्या नावाखाली नागरिकाच्या खिशातील रोकड लंपास करणाऱ्या भोंदू महाराजाच्या कारनाम्याचा डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पर्दाफाश झाला आहे. अंगाला भस्म आणि डोक्यावर भगवी पगडी परिधान करून महाराजाचा वेश धारण केलेल्या भामट्याने हातचलाखीने १० हजार १०० रुपये लंपास केले. बुलढाणा – वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील मदरशाजवळ हा प्रकार घडला असून, नेतंसा येथील राजू मिठ्ठूलाल ओसवाल यांनी डोणगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आह

रस्ता विचारला अन् विश्वास संपादन केला !

राजू ओसवाल हे घराच्या बांधकामासाठी सिमेंट आणण्याकरिता ॲक्टिव्हा दुचाकीने डोणगावकडे जात होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान वाशिम जिल्ह्याची हद्द पार करून बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मदरशाजवळ ते थांबले होते. याचवेळी काळ्या रंगाची चारचाकी त्यांच्या जवळ येऊन थांबली. वाहनातील व्यक्तींनी संभाजीनगरला जाण्याचा मार्ग विचारला. रस्ता सांगण्यासाठी ओसवाल वाहनाजवळ गेले असता गाडीमध्ये दोन व्यक्ती असल्याचे दिसले. त्यापैकी एक चालकाच्या सीटवर, तर दुसरा अंगाला भस्म लावून भगवी पगडी परिधान केलेल्या महाराजाच्या वेशात बसला होता.

आशीर्वादाच्या बहाण्याने हातचलाखी

मार्ग सांगितल्यानंतर भोंदू महाराजाने ओसवाल यांच्या डोक्यावर हात ठेवून चेहऱ्यावरून हात फिरवला. आशीर्वाद देण्याचा बहाणा करीत त्यांच्या खिशात हात घालून १० हजार १०० रुपये काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच ओसवाल यांनी त्याचा हात पकडला; मात्र त्याचवेळी त्यांना चक्कर आल्यासारखे होऊन डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ते खाली बसले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर संशयितांची चारचाकी गायब झाल्याचे तसेच खिशातील पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी डोणगाव येथे राजेंद्र पळसकर यांच्या कार्यालयासमोर एका पोलीस कर्मचाऱ्याला भेटून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मेहकर रोडवरील पुलापर्यंत वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयितांचा मागमूस लागला नाही.

सीसीटीव्हीच्या आधारे भामट्यांचा शोध

यानंतर ओसवाल यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यांची लेखी जबानी नोंदवून घटनास्थळी पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आशीर्वादाच्या नावाखाली नागरिकांना गंडविण्याच्या या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्तींकडून अशा प्रकारे जवळीक साधून फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भोंदू महाराजाच्या वेशात फिरणाऱ्या या भामट्यांचा शोध घेणे डोणगाव पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129