
शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; जिल्ह्यात १८ केंद्रांवर ९ हजार १२४ मतदार बजावणार हक्क
MH 28 News Live / बुलढाणा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज, शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, बुलढाणा जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर ९ हजार १२४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वितरण संबंधित पथकांना करण्यात आले असून, मतदान पथके आपापल्या केंद्रांवर रवाना झाली आहेत.

ओळख पटवण्यासाठी दहा पर्यायी कागदपत्रे ग्राह्य
मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र सादर करता न येणाऱ्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने दहा पर्यायी कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र किंवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खासगी औद्योगिक संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शैक्षणिक संस्थेने जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाने वितरित केलेले मूळ पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड (यूडीआयडी) यांचा समावेश आहे.
मतदानासाठी विशेष रजा आणि सवलत
शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संबंधित मतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्काचा वापर करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक केंद्रावर पाच अधिकारी-कर्मचारी तैनात
जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी अशा एकूण पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सर्व मतदान केंद्रांवरील कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून मतदान प्रक्रियेचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली.



