
सरकारी जमिनीवर कुऱ्हाड; कोणी केली १९ सागवान वृक्षांची कत्तल ? कोणी मारला ४० हजारांच्या लाकडावर डल्ला… लोणी गवळीतील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, घाटबोरीतील वनकारवाईवरूनही चर्चा
MH 28 News Live / डोणगाव : लोणी गवळी येथील सरकारी ‘ई’ वर्ग जमिनीवरील तब्बल १९ सागवानाची झाडे विनापरवानगी तोडून त्यांचे लाकूड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या झाडांचे अंदाजे बाजारमूल्य ४० हजार रुपये असून, या प्रकरणी १४ ऑक्टोबर रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षेत्रीय पाहणीत प्रकार उघड
लोणी गवळी येथील भाग क्रमांक २ चे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी नियमित क्षेत्रीय पाहणी करीत असताना हा प्रकार निदर्शनास आला. मौजे लोणी गवळी येथील गट क्रमांक ५३३, ५५४ आणि ५५५ मधील सरकारी जमिनीवरील सागवानाची झाडे तोडण्यात आल्याचे त्यांना आढळले. अज्ञात व्यक्तींनी कोणतीही परवानगी न घेता झाडे तोडून त्यांचे लाकूड चोरून नेल्याचे समोर आले.

अज्ञात आरोपींचा शोध सुरू
तलाठ्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आजमिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या चोरीमागील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
घाटबोरीतील वनकारवाई आणि अधिकाऱ्यांच्या मनोबलाचा मुद्दा
दरम्यान, घाटबोरी वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड करून सागवानाची चोरी झाल्याच्या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांनी कारवाई करत आरोपी, वापरण्यात आलेला जेसीबी आणि इतर मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे.
मात्र, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा जनमानसात आहे. या दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. वनसंपदेचे संरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल टिकविणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच तक्रारींची निष्पक्ष चौकशी होणेही आवश्यक आहे.
लोणी गवळीतील सागवान चोरी आणि घाटबोरीतील अवैध वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर सरकारी वनसंपदेचे संरक्षण, प्रभावी गस्त आणि दोषींवरील कठोर कारवाई याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.



