
नवरात्रोत्सवात कमळजा मातेच्या दर्शनावर विघ्न! लोणारमध्ये जनआक्रोश; प्रशासनाविरोधात आमरण उपोषण
MH 28 News Live / ( राहुल सरदार ) लोणार : जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढल्याने लोणारकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री कमळजा माता मंदिराचा परिसर पाण्याखाली गेल्याने भाविकांच्या दर्शनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवरात्रोत्सवासारख्या महत्त्वाच्या धार्मिक पर्वातही भाविकांना देवीच्या दर्शनासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मंदिराचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लोणार शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश श्रीराम मापारी, माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे, सुरेश वाठोरे, काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे आणि गोपी आखाडे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली. बसस्थानक चौकातून निघालेला मोर्चा विनायक चौक, बसवेश्वर चौक आणि इरतकर चौक मार्गे तहसील कार्यालयासमोर पोहोचला. त्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले.
नवरात्रोत्सवातही भाविकांना दर्शनासाठी अडचणी
लोणार शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री कमळजा माता मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मात्र, सरोवरातील पाण्याची पातळी वाढल्याने मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाधित झाल्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा आणि सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिस्थितीमुळे भाविकांच्या दर्शनावर संकट निर्माण झाले असून, प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती
लोणार हे धार्मिक श्रद्धा आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. कमळजा माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे स्थानिक व्यापारी, छोटे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच इतर सेवा पुरवणाऱ्यांना रोजगार मिळतो. मात्र, मंदिरात दर्शनासाठी अडचणी कायम राहिल्यास भाविकांची संख्या आणि पर्यटनावर परिणाम होऊन लोणारच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मंदिराचा प्रश्न केवळ धार्मिक नसून तो पर्यटन, रोजगार आणि स्थानिक व्यवसायाशीही निगडित असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
तहसील कार्यालयासमोर सुरू झालेल्या आमरण उपोषणाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल गुगलीया, प्रकाश धुमाळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष अश्रूजी फुके, शहराध्यक्ष शेख समद अहमद, प्रा. गजानन खरात, माजी उपाध्यक्ष बादशाह खान, प्रकाश सानप, प्रदीप संचेती, बांधकाम सभापती अनिकेत मापारी, आरोग्य सभापती अब्दुल उबेद अब्दुल हाजी मुनाफ, पंढरी चाटे, नगरसेवक शाम राऊत, माजी नगरसेवक अंबादास इंगळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख राजू बुधवात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शालिकराव घायाळ, सरपंच शालिक घायाळ आणि गणेश घायाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रकाश धुमाळ, प्रदीप संचेती, बादशाह खान, राजू बुधवात आणि प्रकाश सानप यांनी आपले मनोगत व्यक्त करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. कमळजा माता मंदिराचा प्रश्न तातडीने सोडवून भाविकांना दर्शनासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
नवरात्रोत्सवाच्या काळातच कमळजा माता मंदिराचा प्रश्न ऐरणीवर आल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध करून देणे, संबंधित विभागांमध्ये समन्वय साधणे आणि पाण्याच्या समस्येवर व्यवहार्य व कायमस्वरूपी उपाय शोधणे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
लोणारच्या धार्मिक श्रद्धेशी, पर्यटनाशी आणि स्थानिक नागरिकांच्या अर्थकारणाशी जोडलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या आमरण उपोषणानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि श्री कमळजा माता मंदिराचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे लोणारकरांसह भाविकांचे लक्ष लागले आहे.



