
शेतरस्त्याचा वाद मारहाणीपर्यंत पोहचला…पळसखेड सपकाळमध्ये दहा जणांवर गुन्हा दाखल
MH 28 News Live / अमडापूर : शेतातील रस्त्याच्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे घडली. घरासमोर येऊन पती-पत्नीला शिवीगाळ करणे, लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करणे, सोन्याची गोफ तोडून नुकसान करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा प्रदीप पालवे (वय ५२, रा. पळसखेड सपकाळ) आणि आरोपी यांच्यात शेतातील रस्त्यावरून वाद सुरू असून, यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. याच वादातून २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपींनी कथितरीत्या बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या पतीला व त्यांना शिवीगाळ केली.
यावेळी लोखंडी रॉड व काठ्यांनी फिर्यादी यांच्या पतीच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप आहे. फिर्यादी आणि त्यांची जाऊ भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्या असता, त्यांनाही काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची गोफ तोडून नुकसान केले आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती चेके करीत आहेत. न्यायालयात शेतरस्त्याचा वाद प्रलंबित असतानाच घडलेल्या या कथित मारहाणीमुळे पळसखेड सपकाळ परिसरात चर्चेला उधाण आले आहे.



