
बुलढाणा जिल्ह्यावर जलसंकटाचे ढग गडद; ५२ धरणांतील साठ्याची चिंता ! खरीप हंगाम उध्वस्त, रब्बीवरही दुष्काळाचे सावट; पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाणी आरक्षणाचे प्रशासनासमोर दुहेरी आव्हान
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम उध्वस्त झाला असून, आता रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. त्यातच जिल्ह्यातील ५२ धरणांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतानाच शेतीसाठी पाणी आरक्षित ठेवण्याचे दुहेरी आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

मोठ्या प्रकल्पांतील साठ्यातही घट
जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी खडकपूर्णा धरण यंदा अपेक्षित पावसाअभावी पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. सध्या या धरणात केवळ ६०.९७१७ घनमीटर मृत जलसाठा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, पेनटाकळी धरणातील जलसाठा ७२.५७ टक्के, तर नळगंगा धरणातील साठा ७५ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे, सुमारे सव्वा महिन्यापूर्वी ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरलेली होती. अल्पावधीत झालेली ही घट बाष्पीभवनासह पाण्याच्या वापराचा वाढता परिणाम अधोरेखित करते.
मध्यम प्रकल्पांची स्थितीही चिंताजनक
जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी तोरणा धरणात ऑक्टोबरअखेरीस केवळ २८.१४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मन धरणात ४१.४१ टक्के, तर मस धरणात ५८.७ टक्के साठा उपलब्ध आहे. कोराडी धरणात ७८ टक्के आणि उतावळी धरणात ८७ टक्के जलसाठा आहे. तुलनेने ज्ञानगंगा धरणातील ९५ टक्के आणि पलढग धरणातील ९७ टक्के साठा दिलासादायक आहे. मात्र, काही प्रकल्पांतील समाधानकारक स्थितीमुळे संपूर्ण जिल्ह्यावरील दुष्काळाचे संकट कमी होताना दिसत नाही.
लघु प्रकल्पांतही निम्म्यापेक्षा कमी पाणी
जिल्ह्यातील ४२ लघु प्रकल्पांची स्थितीही पाणीटंचाईची चिंता वाढवणारी आहे. या प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १०६ दशलक्ष घनमीटर असताना सध्या केवळ ४७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील साठाही दीड महिन्यापूर्वीच्या शंभर टक्क्यांवरून घसरून ७३.३९ टक्क्यांवर आला आहे.
पाणी नियोजनाची कसोटी
एकीकडे पिण्याच्या पाण्याची गरज, तर दुसरीकडे रब्बी हंगामासाठी सिंचनाची अपेक्षा, अशा दुहेरी कोंडीत जिल्हा प्रशासन सापडण्याची शक्यता आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि संभाव्य टंचाईग्रस्त भागांसाठी पर्यायी उपाययोजना यांना आता प्राधान्य देणे आवश्यक ठरणार आहे. पावसाची स्थिती आणि जलसाठ्यातील घट लक्षात घेता, आगामी उन्हाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होण्याची भीती व्यक्त होत आहे.



