♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अवकाश तंत्रज्ञानात शेगावच्या युवकाची जागतिक भरारी ! उपग्रह आणि यायच्या मदतीने पुराचे विश्लेषण करणाऱ्या शुभम तायडे यांच्या ‘फ्लडलेन्स एआय’ प्रकल्पाला बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार; विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक

MH 28 News Live / शेगाव : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक क्षितिजावर बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या एका युवा तंत्रज्ञाने आपल्या प्रतिभेची ठळक छाप उमटवली आहे. शेगाव येथील युवा तंत्रज्ञ शुभम गजानन तायडे यांनी आपल्या संशोधनाच्या बळावर संत नगरी शेगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘स्पेस इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शुभम यांच्या चमूला ‘स्पेस शिफ्ट – कंपनी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या ‘फ्लडलेन्स एआय’ या अभिनव संशोधन प्रकल्पाने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले असून, विज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

‘फ्लडलेन्स एआय : फ्रॉम सॅटेलाइट ऑब्झर्वेशन्स टू ॲक्शनेबल फ्लड रिस्पॉन्स इंटेलिजन्स’ या संकल्पनेवर हा प्रकल्प आधारित आहे. उपग्रहांकडून मिळणारी निरीक्षणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करून पूरस्थितीचे अचूक विश्लेषण करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. पूरग्रस्त भागांची माहिती तातडीने संकलित करणे, बाधित क्षेत्रांचे स्वरूप समजून घेणे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला वेळेत प्रभावी निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे, हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्तींच्या काळात जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होऊ शकतो.

जपान स्पेस फोरमच्या वतीने ‘एपीआरएसएएफ-३२’ या कार्यक्रमांतर्गत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ‘युनिसेक’ आणि क्युशु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचे सहकार्य लाभले. या महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पात शुभम तायडे यांच्यासोबत अनुकृती दीक्षित आणि शशांक मौर्य यांनीही मोलाचे योगदान दिले. शुभम हे बेंगळुरू येथील ‘डीएफवाय-ग्रॅविटी टेक्नॉलॉजीज’ या संस्थेशी जोडलेले असून, अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या भविष्यवेधी क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांच्या चमूने साकारलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेली ही दाद त्यांच्या तांत्रिक कौशल्याची आणि संशोधनवृत्तीची साक्ष देणारी आहे.

शेगावसारख्या शहरातून पुढे येत जागतिक विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या शुभम तायडे यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील युवा पिढीसमोर संशोधन आणि नवोपक्रमाचे नवे दालन खुले झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल वडील जी. ओ. तायडे, आई सुनीता तायडे यांच्यासह मित्रपरिवार, नातेवाईक आणि शेगावमधील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केवळ वैयक्तिक यश न राहता शेगावच्या भूमीतून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या या कामगिरीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. विज्ञान, अवकाश संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात शेगावच्या या युवकाने गाठलेली आंतरराष्ट्रीय उंची निश्चितच जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129