♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

किडनॅपिंगचा थरार! अखेर समोर आले धक्कादायक वास्तव सराफा व्यापाऱ्याला तेलंगणा एलसीबीने ताब्यात घेतल्याचे उघड; जिल्हाभर पोलिसांची धावपळ, साखरखेर्डा येथे इनोव्हा अडविल्यानंतर गूढ उकलले!

MH 28 News Live / : देऊळगाव राजा : सराफा व्यापाऱ्याला तेलंगणा एलसीबीने ताब्यात घेतल्याचे उघड; जिल्हाभर पोलिसांची धावपळ, साखरखेर्डा येथे इनोव्हा अडविल्यानंतर गूढ उकलले!निबंधक कार्यालयासमोरून भरदिवसा सराफा व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याच्या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र, दिवसभर सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर या कथित अपहरणामागील वेगळेच वास्तव समोर आले. देऊळगाव मही येथील सराफा व्यापारी अनिरुद्ध मधुकर शिंगणे यांना तेलंगणा राज्यातील एलसीबी पोलिसांनी सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, पोलिसांच्या गणवेशात किंवा अधिकाऱ्यांची ओळख देत आलेल्या व्यक्तींनी त्यांना इनोव्हा कारमधून नेल्याने सुरुवातीला अपहरणाचा संशय बळावला होता.

 

देऊळगाव मही येथील रहिवासी अनिरुद्ध शिंगणे यांचे सोने-चांदीचे दुकान असून ते जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातही सक्रिय आहेत. सोमवारी (ता. २) ते जमिनीच्या व्यवहारानिमित्त देऊळगाव राजा येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात आले होते. दुपारी सव्वा एकच्या सुमारास सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांना बोलावले. आपण एलसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत या व्यक्तींनी शिंगणे यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून तेथून नेले. हा प्रकार त्यांचे मामा तथा शिक्षक चेके यांनी प्रत्यक्ष पाहिला. अनोळखी व्यक्तींनी शिंगणे यांना जबरदस्तीने पळवून नेल्याची माहिती परिसरात पसरताच अपहरणाची चर्चा सुरू झाली आणि देऊळगाव मही परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देऊळगाव मही येथील नागरिकांनी तातडीने देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी वरिष्ठांना माहिती देताच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानंतर नियंत्रण कक्षातून जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांना संबंधित इनोव्हा कारची माहिती देण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यासह शेजारील जालना जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरही वाहनांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित इनोव्हा कार अडविण्यात आली. मात्र, कारमधील व्यक्ती अपहरणकर्ते नसून तेलंगणा राज्यातील एलसीबी पोलीस असल्याचे समोर आले आणि संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले.

तेलंगणा पोलिसांनी सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीतील कथित गैरव्यवहाराच्या तपासाच्या अनुषंगाने अनिरुद्ध शिंगणे यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. मात्र, दुसऱ्या राज्यातील पोलिसांनी स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या. वृत्त लिहिपर्यंत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तेलंगणा एलसीबी पथकाकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. देऊळगाव राजा पोलिसांकडूनही या प्रकरणाची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सराफा व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यामागील नेमके कारण, संबंधित गैरव्यवहाराचे स्वरूप आणि पुढील कायदेशीर कारवाई याबाबतची उत्सुकता कायम आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129